व्यक्तीच्या मृत्यूनंतर Aadhaar-PAN, पासपोर्ट, वोटर आयडी या कागदपत्रांचं काय होतं? जाणून घ्या डिटेल्स

76

नवी दिल्ली, 22 जुलै: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं (Important Documents) असतात. सरकारी ओळखपत्र म्हणून ही कागदपत्रं महत्त्वाची आहेत. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर या कागदपत्रांचं काय करायचं असतं, याची तुम्हाला माहिती आहे का? ही कागदपत्रं आपोआप रद्द होतात की कुटुंबातल्या व्यक्तींना ती रद्द (Cancelling ID) करावी लागतात? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येत असतील. जाणून घ्या या कागदपत्रांचं नंतर काय होतं?

आधार कार्ड (Aadhaar Card) –

आधार नंबर ओळखपत्र म्हणून आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. एलपीजी सबसिडी, सरकारी शिष्यवृत्ती, ईपीएफओ खातं आदी सर्व महत्त्वाच्या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक देणं गरजेचं असतं. UIDAI या प्राधिकरणाकडे आधारचं व्यवस्थापन असतं. मृत व्यक्तीचं आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया UIDAI कडे नाही. मात्र मृत व्यक्तीने पूर्वी सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याच्या कुटुंबीयांना त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती UIDAI कडे देणं गरजेचं आहे. कारण सरकारी योजना आधारशी लिंक असतात.

पॅन कार्ड (PAN Card) –

इन्कम टॅक्स भरण्यासह अन्य आर्थिक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. पॅनकार्ड अनेक अकाउंटशी जोडलेलं असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृताच्या कुटुंबातील व्यक्तींनी आयकर विभागाशी संपर्क साधून पॅनकार्ड सरेंडर करणं आवश्यक असतं. मात्र ते सरेंडर करण्यापूर्वी मृत व्यक्तीची सर्व खाती बंद करण्यात आली आहेत, याची खात्री करावी.

मतदार ओळखपत्र (Voter ID) –

मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी कार्ड हे मतदान करण्यासाठी अत्यावश्यक असलेलं ओळखपत्र आहे. मतदार यादीत तुमचं नाव समाविष्ट असल्याचा हा पुरावा आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर मतदार ओळखपत्र रद्द करता येतं. मतदार नोंदणी नियम 1960 अंतर्गत मतदार ओळखपत्र मतदाराच्या मृत्यूनंतर रद्द करण्याची तरतूद आहे. कुटुंबातल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधिताचं मतदार ओळखपत्र निवडणूक कार्यालयात जाऊन सात नंबरचा फॉर्म भरून रद्द करता येतं.

पासपोर्ट (Passport) –

मृत्यूनंतर पासपोर्ट रद्द करण्याची काही तरतूद नाही. मात्र पासपोर्टचा वैधता कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा रिन्यू केलं नाही की ते आपोआपच रद्द होतं.