शेतीच्या जुन्या वादामधुन लहान भावाने मोठ्या भावाला यमसदनी पाठविल्याची घटना तालुक्यातील सिंतळा येथे घडली. सिंतळा येथील रहीवाशी विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (६५) आणि सुनिल पुंजाराम वैरागडे (४२) दोघेही सख्खे भाऊ. दोघांमध्ये अनेक वर्षापासुन वडीलोपार्जीत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादामधुन लहान भाऊ सुनिल वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे याचा काटा काढला. आज दुपारी ११.३० वा. चे सुमारास विश्वनाथ म्हैसी घेवुन घराकडे जात असताना सिंतळा रेगडी मार्गावरील नाल्याजवळ पाळतीवर असलेल्या सुनिलने पाठीमागेहुन येवुन कु-हाडीने विश्वनाथच्या डोक्यावर वार केले. कु-हाडीचे वार जबर असल्याने विश्वनाथ जागीच गतप्राण झाला. घटनेची माहीती होताच ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी सहका-यांसह घटनास्थळ व सिंतळा येथे जावुन सुनील वैरागडे याला ताब्यात घेवुन मृतक विश्वनाथचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे घेवुन आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत ठवरे करीत आहेत.
Home आपला जिल्हा शेतीच्या वादातुन लहान भावाने मोठ्या भावाला यमसदनी पाठविले मुल तालुक्यातील सिंतळा येथील...