नवी दिल्ली : पीएम-शेतकरी सन्मान योजनेचा २ हजार रुपयांचा नववा हप्ता येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्याचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार वर्षाला ६ हजार रुपये, प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. या योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी ही रक्कम सरकार देते. या योजनेत आतापर्यंत ८ हप्ते सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. अनेक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी ऑनलाइन तपासून पाहावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
असे तपासा आपले नाव
सर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
होमपेजवर दिसणाऱ्या Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करा
आता ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक अशा क्रमाने जाऊन शेवटी गाव निवडा
त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
लाभार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल. त्यात स्वत:चे नाव आहे का, हे तपासून घ्या.