ग्रीन गणेशा समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम एडवोकेट बाबासाहेब वासाडे

54

मुल दिनांक ३० ऑगस्ट २०२१

पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजात पर्यावरणाचा संदेश देणे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक नवभारत कन्या विद्यालय मूलच्या वतीने पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी “ग्रीन गणेशा” हा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरण प्रदूषणाया सोबतच गणेश मूर्तीचीही विटंबना होते. श्रद्धेचा अपमान होतो आणि हे दूर करण्यासाठी पर्यावरण पूरक मातीच्या गणपतीचा संदेश देणे अत्यावश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सरस्वती, गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मंचावर नगराध्यक्षा प्राचार्य रत्नमाला भोयर, शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे सचिव अॅड. अनिल वैरागडे, मूल पंचायत समितीचे सभापती नंदू मारगोनवार, भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, मुख्याध्यापिका शुभांगिनी वैरागडे, पर्यवेक्षिका मंगला सुंकरवार उपस्थित होत्या.
कलाशिक्षक कार्तिक नांदुरकर यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमा मागील संकल्पना स्पष्ट केली. मुख्याध्यापिका सौ. वैरागडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन विजय सिद्धावार यांनी तर आभारप्रदर्शन दिनेश जिड्डीवार यांनी केले.
ग्रीन गणेशा या उपक्रमात 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेत मातीच्या सुबक गणेशमूर्ती तयार केल्या. उपस्थितांनी या मूर्तीचे कौतुक केले. लवकरच या मुर्त्या रंगरंगोटी करून मुलच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून यातून विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या निमित्याने विद्यार्थिनींनी “ग्रीन गणेशा” संकल्पनेवर आधारित चित्र रेखाटले त्याचीही प्रदर्शनी यानिमित्ताने लावण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.