नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक महत्त्वाची योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM kisan Samman Nidhi Scheme) आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये पाठवण्यात येतात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने (DBT) शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नववा हप्ता जमा करण्यात आला. दरम्यान, काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये (Farmers beneficiary list)आहे. मात्र त्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही.
‘या’ चुका करतात शेतकरी
शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना या योजनेचे 2000 रुपये मिळत नाही. कारण योजनेच्या अटीनुसार त्यांनी याकरता अर्ज भरलेला नसतो. योजनेच्या अर्जामध्ये तुमचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरताना त्यांचे नाव मराठीत किंवा अन्य भाषेत लिहिले आहे, त्यांनी यामध्ये सुधारणा करून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. अर्जात केवळ इंग्रजी अल्फाबेटमध्ये नाव प्रविष्ट करता येते. याशिवाय, पीएम किसानच्या योजना अर्जावरील नाव आणि तुमच्या ज्या खात्यात पैसे येणार आहेत त्यामधील नाव वेगवेगळे असल्यास हे पैसे अडकू शकतात. अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे नाव आधारवरील नावाप्रमाणे बँक खाते आणि अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, बँक अकाउंट क्रमांक, आयएफएससी कोड आणि गावाचे नाव योग्य पद्धतीने लिहिले पाहिजे.
अशाप्रकारे दुरुस्त करा तुमच्या चुका
>>सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा.
>> त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्याठिकाणी Edit Aadhaar Details तुम्हाला क्लिक करावं लागेल.
>> त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता
>> तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावं लागेल
>> नावात चूक असेल तर ती देखील ऑनलाइन तपासू शकता.
>> खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता
>> शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता.
>> Helpdesk ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर ज्या काही चुका आहेत त्या सुधारू शकता.
‘या’ नंबरवर करू शकता कॉल
पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 वर कॉल करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.