ध्येयवेड्या तरुणाची मत्स्य व्यवसायात भरारी! परंपरागत शेतीला फाटा: लाखोचे उत्पन्न.
मूल (प्रकाश चलाख)
तालुक्यातील मौजा हळदी गावगन्ना येथील एका ध्येयवेड्या तरुणाने जिद्द, चिकाटी,व परिश्रम या बळावर परंपरागत शेतीला फाटा देत मत्स्य व्यवसायात उंच भरारी घेतली असून या व्यवसायातून तो लाखोंचे उत्पन्न घेत आहे. संदीप नंदाजी भुरसे असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव असून एका लहानश्या खेड्यामध्ये मत्स्य व्यवसायात उत्तुंग भरारी घेतल्याने त्याच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.परंपरागत शेतीत या तरुणाचे मन रमत नसल्याने त्यांनी परंपरागत शेतीला बगल देत शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण करावे व लाखोंचे उत्पन्न मिळावे या उद्देशाने मनात जिद्द, चिकाटी निर्माण केली. या बळावर त्याने परिश्रम घेऊन मत्स्य व्यवसाय करण्याचे ठरविले. शासनाचे कुठलेही अर्थ साहाय्य न घेता स्वतःचे भांडवल उभे करून आपल्या शेतात दीड एकर मध्ये दोन मत्स्य तलाव निर्माण केले.
मत्स्य व्यवसायात त्यांनी रोहू, कटला, ग्लास, सिपणर नीलगर या पाच प्रजाती वापरल्या. यावर त्यांनी दोन लाख रुपये खर्च करून या व्यवसायामधुन तो आज वार्षिक सहा लाख रुपये कमवीत आहे.
यावरच या तरुणाचे समाधान न झाल्याने त्यांनी मत्स्य तलावाच्या कडेच्या बांधावर बागायती शेती करण्याचा उपक्रम राबविला. या बांधावर त्यांनी वांगे, वाल, तुर, भेंडी व इतर पिके घेत असून यापासूनही तो हजारो रुपये कमवीत आहे.
मत्स्य व्यवसायासाठी कुठलेही प्रशिक्षण न घेता स्वतःच्या बुद्धीने सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. यातून कुटुंबाचा आर्थिक प्रश्न मिटला असून अनेक नाविन्यपूर्ण योजना शेतात राबविण्याचा त्याचा मानस आहे.शेतात मत्सव्यवसाय करीत असताना कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार घेत त्यांनाही या कामात रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
मत्स्य व्यवसायात पैशाची लागत कमी असल्याने व अधिक नफा मिळत असल्याने परंपरागत शेती सोबत मत्सव्यवसाय करावे असा त्याचा तरुण शेतकरी मंडळींना संदेश आहे.
शासकीय मदत व योजना.
“शेतकरी व होतकरू तरुण मंडळींना मत्स्य व्यवसायात शासकीय मदत मिळत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. शासनाने मत्स्य व्यवसायातील योजना गोरगरीब होतकरू तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास मत्स्यव्यवसाय या क्षेत्रात भविष्यात परंपरागत शेती सोबत चित्र बदललेले दिसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.”