मूल : नागरिकांच्या सुरक्षेसाठी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी मुल शहरात बसविण्यात
आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने, ‘असून अडचण आणि नसून खोळंबा ‘ असे चित्र सध्या दिसत आहे. कायदा व सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारी प्रवृृत्तीवर आळा बसावा. प्रसंगी त्याचा शोध घेण्यास सहकार्य व्हावे. या उद्देशाने शहराच्या मुख्य ठिकाणी बसविण्यात आलेले अनेक सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने प्रशासनाच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर कॅमेरे त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
शहरात घडणाऱ्या चोऱ्या, अपघात किंवा अन्य वाम कृत्यांवर पोलीस प्रशासनाला नियंत्रण ठेवता यावे किंवा एखादे गंभीर व जीवघेणे कृत्य घडल्यास सदर कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मदत व्हावी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार नगर परिषदेने शहराच्या मुख्य मार्गासोबतच महत्वाच्या १५ ते २० ठिकाणी लाखो रूपये खर्चुन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले. शहराच्या विविध भागात लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आले असले तरी त्याचे थेट चित्रण पाहण्याची व रेकार्डिंगची व्यवस्था पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एखादी अनुसूचित घटना, चोरी किंवा अपघात घडल्यास त्याचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य मिळत असते. परंतु शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यात आलेल्या १५ ते २० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांपैकी केवळ ७ ते ८ कॅमेरे सद्यस्थितीत सुरू असून उर्वरित सर्व कॅमेरे मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी बंद असलेले सर्व कॅमेरे सुस्थितीत करून मिळावे म्हणून मागील कित्येक महिन्यांपासून स्थानिक पोलीस प्रशासन नगर परिषदेकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु जनतेच्या जीवित आणि मालमत्तेशिवाय कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या कामी पोलीस प्रशासनाला महत्वाचे सहकार्य करणारे अध्र्यापेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेरे बंदावस्थेत असल्याने भविष्यात एखाद्या घटनेचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे विधायक उद्देशाने बसविण्यात आलेले शहरातील सर्वच सीसीटिव्ही कॅमेरे नगर प्रशासनाने सुस्थितीत करून द्यावे, अशी मागणी पोलीस प्रशासनासोबतच अनेक सुज्ञ नागरिकांनी केली आहे.