उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्रांकरिता तातडीने त्रुटीची पूर्तता करावी – उपायुक्त विजय वाकुलकर

41

चंद्रपूर
जानेवारी ते नोव्हेंबर २0२१ पयर्ंत चंद्रपूर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एकूण १0 हजार ८८३ प्रकरणे निकाली काढली आहेत. तर चालू महिन्यात ४0७ प्रकरणे त्रुटीमध्ये असल्याने जात वैधता प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, निवडून आलेल्या उमेदवारांची अपात्रता तसेच कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती इत्यादी नुकसान होऊ नये, याकरिता उमेदवारांनी तातडीने त्रुटीपूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांचे जात प्रमाणपत्र तपासून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते.

यामध्ये विद्यार्थी, निवडणुकीचे उमेदवार व कर्मचारी इत्यादी उमेदवारांचा समावेश असतो. समितीने माहे जानेवारी २0२१ ते आजपयर्ंत १0 हजार ८८३ प्रकरणे निकाली काढली असून सद्यस्थितीत समितीकडे त्रुटीमध्ये ४0७ प्रकरणे प्रलंबित आहेत. या उमेदवारांना त्रुटींची पूर्तता करण्याकरिता भ्रमणध्वनी संदेश, ई-मेल व पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. परंतु उमेदवारांकडून त्रुटीपूर्तता होत नसल्याने, प्रकरणे निकाली काढता आलेली नाहीत. यामध्ये विद्यार्थी-३0५, निवडणूक-९0 व सेवेची-१२ अशी एकूण ४0७ प्रकरणे प्रलंबित आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळाली असली तरी प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीपूर्वी त्रुटीपूर्तता होणे आवश्यक आहे. निवडणुकीची वैधता प्रमाणपत्र ३१ डिसेंबर पूर्वी सादर करावयाची असल्याने, अशा उमेदवारांकडून त्रुटीची पूर्तता होणे आवश्यक आहे.

तरी अशा उमेदवारांनी तातडीने त्रुटींची पूर्तता करावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.