चंद्रपूर,दि.22 डिसेंबर : दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. परंतु वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार, धोरणात्मक निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी तसेच 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर दृष्टीकोन लक्षात घेऊन निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाची विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनात प्रथम टप्प्यात जिल्ह्यामध्ये ‘स्वावलंबन’ या ऑनलाइन पोर्टलद्वारे ऑनलाइन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र कार्ड (UDID) देण्यासाठी विशेष मोहीम कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे प्रत्येक तालुक्यातील 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व निदान करून जलदगतीने दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्र व प्रमाणपत्राद्वारे दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक तथा सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता येईल. ज्यामुळे त्यांचे आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी निवडक ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रनिहाय तपासणी व निदान शिबिरांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणात समाविष्ट वैद्यकीय विभागातील सर्व वैद्यकीय तज्ञ डॉक्टर आणि व्यावसायिक तज्ञ यांच्याद्वारे पुढील महिन्यात ग्रामीण व तालुका पातळीवर तपासणी व निदान शिबिरे आयोजित करून दिव्यांग प्रमाणपत्र अद्यापपर्यंत न काढलेल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रमाणपत्र व ओळखपत्राआधारे या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा मिळणार लाभ:
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले विविध प्रकारचे साहित्य, साधने व उपकरणे यांचा लाभ, अनेक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, विवाह प्रोत्साहनपर योजनेचा लाभ, कौशल्य विकास विभागामार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण, मतदार यादीत दिव्यांग मतदार म्हणून मतदानाचा समान हक्क, दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि परीक्षेत सवलती, दिव्यांग व्यक्ती,विद्यार्थी व खेळाडू यांना प्रोत्साहन आणि अर्थसहाय्य, दिव्यांग व्यक्ती, बालक आणि त्याच्या पालकांना गृहकरामध्ये सवलत आणि सूट, घेता येईल.
अनुसूचित जातीतील दिव्यांग व्यक्तींकरिता रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ, गरजू दिव्यांगाना शिधापत्रिकेचा लाभ, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदी योजनांचा दिव्यांग व्यक्तींना लाभ घेता येईल.
तरी,जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्ती,पालक, शिक्षक, दिव्यांग संघटनानी ज्या व्यक्तीकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाहीत व ज्यांच्याकडे जुने वैद्यकीय प्रमाणपत्र आहेत, अशा सर्वांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता जवळच्या नागरी सुविधा केंद्रातील कॉमन सर्विस सेंटर किंवा सेतू कार्यालयात जाऊन https://www.swavlambancard.gov.in या पोर्टलवर प्राथमिक नोंदणी करावी. तसेच तालुकास्तरावर उपलब्ध वेळापत्रकानुसार घेण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.