कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम

68

चंद्रपूर दि. 22 डिसेंबर:  उपविभागीय कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालयाच्यावतीने बारामती जि.पुणे येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण भेट कार्यक्रम राबविण्यात आला. बारामती जि.पुणे येथिल आधुनिक शेती, नियंत्रित शेती व उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनाने चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर,                                                                                                                           मुल आणि सावली तालुक्यातील एकूण 60 शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षणाकरिता सहभाग नोंदविला.

दौऱ्याचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना दौरा किटचे वितरण करण्यात आले. तसेच संपूर्ण पाच दिवस असणाऱ्या या दौरा कार्यक्रमासंदर्भात व भेटी देण्यात येणाऱ्या स्थळांबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. दौऱ्यादरम्यान कृषी सहाय्यक निलेश इंगळे, राहुल अहिरराव तसेच निशा उईके आदी कर्मचारी सोबत होते.

दौऱ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, माळेगाव सहकारी साखर कारखाना तसेच कोळोली येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळे अस्तरीकरण, आंतरपिके इत्यादी प्रक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या. यावेळी सदर दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक उन्नती करावी. असे तज्ञ मार्गदर्शकाकडून यावेळी सांगण्यात आले.

सदर दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील तंत्र अधिकारी एम.आर. ताटिकुंडलवार, कृषी पर्यवेक्षक आर. सि. पेंदोर, कृषी सहाय्यक एस. के. घुगरे, एम.बी. धोत्रे, आर.गायकवाड, श्री.तावाडे यांचे सहकार्य लाभले.