स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत – सावित्रीबाई फुले

78

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी लोकचळवळ उभारत स्त्र्ायांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला अन् त्यांना सामाजिक, आर्थिक व वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं.

हे करत असताना फुले दांपत्याला कर्मकांडी पंडितांच्या अमानुष कारवायांचा त्रास सहन करावा लागला. हा सर्व अपमान व छळ सोसूनही सावित्रीबाई आपल्या ध्येयापासून दूर गेल्या नाहीत. त्यांनी स्त्री स्वातंत्र्य अन् स्त्री शिक्षणाचा लढा अविरत सुरू ठेवून अखेर सावित्रीच्या लेकींना पुरुषांबरोबरीचा समानतेचा अधिकार प्राप्त करून दिला.

तत्कालीन काळात स्त्र्ायांना शिक्षण घेण्यास मनाई होती. त्यांना ‘चूल व मूल’ या चौकटीतच जीवन कंठीत करावं लागायचं. फुले दांपत्याने तत्कालीन कर्मकांडी मंडळीच्या विरोधाची तमा न बाळगता स्त्री शिक्षणाचा विडा उचलून
1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे भिडेंच्या वाडय़ात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा पारतंत्र्य काळातील हिंदुस्थानमधील पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. खरं तर त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. आज सावित्रीच्या लेकी मोठमोठय़ा पदांवर विराजमान होऊन विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. ही खरी फुले दांपत्याची पुण्याई म्हणावी.

तत्कालीन समाजात शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार-प्रचार व्हावा या उद्देशाने फुले दांपत्याने शाळांमधील गळती थांबविण्यासाठी ‘प्रोत्साहन भत्ता’ अन् ‘आवडेल ते शिक्षण’ देण्यावर भर दिला. वास्तवात 19 व्या शतकात स्त्री शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय ठरून त्यातून रयतेला शिक्षणाचे महत्त्व व उपयुक्तता याची अनुभूती आली. इतकेच नव्हे तर समाजप्रबोधन होऊन मानवी अधिकारांची जाणीव होण्यास चालना मिळत गेली. जातीभेद, वर्णभेद, बालविवाह, केशवपन या कुप्रथा व जुनाट रूढींचे उच्चाटन केलं. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहास मान्यता देण्यास इंग्रज सरकारला भाग पाडलं. समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठं योगदान देऊन त्यासाठी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. शिक्षणाची महती गातांना सावित्रीबाई म्हणायच्या ‘शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हरते पहा! विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून! तिचा साठा जयापाशी, त्यास ज्ञानी मानिती जना!’

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धरी’ या शब्दात त्यांनी जनतेला स्त्रीचे महात्म्य विशद केलं. शिक्षण न घेतल्याने मानवाचे केवढे मोठे नुकसान होते हे सांगताना फुले म्हणत ‘विद्या विना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले.’ दस्तुरखुद्द जोतिबांनी 1882 मध्ये हंटर कमिशन पुढे कैफियत मांडून केवळ उच्चवर्णीयांसाठी शैक्षणिक धोरण न ठरविता समानतेच्या आधारावर तळागाळातील लोकांच्या पाल्यांसाठीदेखील शिक्षणाची तजवीज व्हावी, जेणेकरून समाजातील निरक्षरता दूर होऊन गरिबी व जातीभेद संपुष्टात येईल अन् त्यातून सर्वांना मानवी हक्कांची फळे चाखायला मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील नेत्रदीपक कार्यासाठी इंग्रज प्रशासनाने 1852 मध्ये फुले दांपत्याचा शालजोडी देऊन सत्कार केला. हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी पावती होय.

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीचा सन्मान करत जेथून त्यांनी स्त्री शिक्षणाची बीजे रोवली त्या पुणे या विद्येच्या माहेरघरी महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नामांतर केले. अर्थातच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील महान कामगिरीची हीच खरी पावती आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत उच्च शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचा अन् समाजाचा विकास साधण्यासाठी आपले योगदान द्यावे म्हणजे हीच खरी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल.