वाघाचा बंदोबस्ताशिवाय शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये द्या परीसरातील सरपंचाचे वनविभागाला साकडे

40

मुल परीसरात वाघांचे हल्ले वाढले असुन यावर्षी तालुक्यातील पंधरा जणांना वाघाने यमसदनी पाठविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामूळे वाघांचा दहशती मध्ये वावरणा-या शेतकऱ्यांना प्रतीवर्षी एकरी ५० हजार रूपयाची मदत द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परीसरातील सरपंचानी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील मारोडा-राजोली जि.प.गटातील पडझरी येथे वाघाने शेतात गुरे चारत असलेल्या प्रमोद मोहुर्ले या युवा शेतकऱ्याला ठार केले होते. सदर घटनेपुर्वी याच जि.प.गटातील मारोडा येथील मनोहर प्रधाने आणि गजानन गुरनुले, करवन येथील रमेश वेलादी आणि रामभाऊ मरापे, कोसंबी येथील ज्ञानेश्वरी मोहुर्ले, चिंचोली येथील राजेंद्र ठाकरे, मोरवाही येथील सरीता पाल आणि भादुर्णी येथील खुशाल सोनुले या शेतक-यांचा तर परीसरातील ४० ते ५० गुरांचा वाघाच्या हल्याने मृत्यु झाला आहे. सात महीण्याच्या कालावधीत घडलेल्या या जीवघेण्या घटनेमूळे तालुक्यातील मारोडा, करवन, काटवन, उश्राळा, भादुर्णी, पडझरी, मोरवाही, कोसंबी आणि चिंचोली या गांवातील शेतकरी भयभीत झाले असुन दहशतीमध्ये जीवन जगत आहेत. ही सर्व गांव वनविभागाच्या बफर झोन क्षेञात समाविष्ठ असुन बहुतांश शेती जंगलाला लागुन आहे. शेतीची मशागत आणि गुरे चारण्यासाठी दररोज शेतात ये जा केल्याशिवाय परीसरातील शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. परंतु अलीकडे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर वाघाचे हल्ले वाढले असुन वाघाच्या हल्यात आतापर्यंत परीसरातील नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे वाघचं नव्हे तर कोणताही वन्यप्राणी शेतात गेल्यावर केव्हा कोठुन कसा हल्ला करेल. हे न सांगता येणारे असल्याने परीसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे परीसरात वावरत असलेल्या वाघांचा त्वरीत बंदोबस्त करावा. अशी मागणी करतांना भेटलेल्या शिष्टमंडळाने परीसरातील ९५% जनता शेतीवर अवलंबुन असुन वाघाच्या दहशतीमूळे शेती करायची कशी ? असा गंभीर प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. वाघाच्या भितीमूळे परीसरातील शेतकरी शेतीची मशागत आणि गुरे चारण्यासाठी शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याने त्यांचे कुटूंबासमोर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यामूळे उपासमारीच्या संकटात सापडलेल्या परीसरातील शेतकऱ्यांना कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविता येण्यासाठी प्रतीवर्षी एकरी ५० हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या सहकार्याने तिव्र आंदोलन कराण्यात येईल. असा इशारा उप वनसंरक्षक गुरूप्रसाद यांना प्रत्यक्ष भेटुन दिला आहे. वन विभागाच्या स्थानिक विश्राम गृहात भेटलेल्या शिष्टमंडळात सरपंच रविंद्र कामडी (कोसंबी) भिकारू शेंडे (मारोडा) रेवता सोनुले (भादुर्णी) अनुराधा नेवारे (मोरवाही) बंडु नर्मलवार (उश्राळा) वंदना पेंदोर (काटवन) मोरवाहीच्या उपसरपंच वर्षा आरेकर आणि वनपरीक्षेञ अधिकारी घनश्याम नायगमकर आदी उपस्थित होते.

वाघाच्या हल्यात ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यु झाला, त्या तालुक्यातील पंधरा कुटूंबातील एका व्यक्तीस वनविभागाने रोजगार द्यावा, वनविभागाच्या आर्थिक मदतीपासुन वंचित असलेल्या कुटूंबाला सात दिवसाचे आंत आर्थिक मदत दिल्या जावी आणि वाघांच्या बंदोबस्तासाठी त्वरीत उपाय योजना करावी. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष राकेश रत्नावार, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक पुल्लावार, काँग्रेसचे शहर सचिव सुरेश फुलझेले, उपाध्यक्ष संदीप मोहबे, लोकनाथ नर्मलवार, विक्रम गुरनुले यांनी उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांचे कडे केली आहे.

वाघ आणि वन्यप्राण्यांपासुन परीसरातील शेतकरी भयभित झाला असुन शेती करायची कशी ? असे संकट त्यांचे समोर निर्माण झाल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
संध्या गुरनुले
माजी अध्यक्ष जि.प.चंद्रपूर तथा अध्यक्ष, तालुका भाजपाध्यक्ष

वाघापासुन शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वनविभागाने वाघ पकडण्याची मोहीम हाती घेतली असुन वनविभागाचे दोन तज्ञ पथक परीसरात सक्रिय झाली आहे. लवकरच वाघ पिंजराबंद होईल. असा विश्वास आहे.
घनश्याम नायगमकर
वनपरीक्षेञ अधिकारी मूल