चंद्रपूर, दि. 21 जुलै : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र घटकांसाठी शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात.
Ø शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना महामंडळामार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश:
राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देणे हा आहे.
योजनेचे स्वरूप:
इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज मर्यादित वितरित केलेल्या रकमेवर कमाल 12 टक्के व्याजदरापर्यंत व्याज परतावा अदा करण्यात येईल. यामध्ये देशांतर्गत व राज्यांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्जमर्यादा रुपये 10 लक्ष तर परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रुपये 20 लक्षापर्यंत राहील.
Ø 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना:
योजनेची महत्तम कर्जमर्यादा 5 लक्ष रुपयापर्यंत असून राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सदर योजना राबविण्यात येते. योजनेत लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळ सहभाग 20 टक्के तर बँकेचा सहभाग 75 टक्के असतो. महामंडळ सहभागावर व्याजदर 6 टक्के व परतफेड कालावधी 5 वर्षापर्यंत असतो.
Ø थेट कर्ज योजना (रु. 1 लाखापर्यंत):
सदर योजनेची महत्तम कर्ज मर्यादा 1 लक्ष रुपयापर्यंत असून लाभार्थ्यांचा सहभाग हा निरंक असतो. परतफेडीचा कालावधी 4 वर्ष (मुद्दल दरमहा रु. 2085 समान मासिक हप्त्यामध्ये), नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही तर थकीत झालेल्या प्रत्येक हप्त्यांवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
योजनेचे निकष :
अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु. 1 लाखाच्या मर्यादेत असावे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर अथवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.