प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6 हजार रुपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. लवकरच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.
मात्र, शेतकऱ्यांची बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक नाहीत. त्यामुळे शेतकरी या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अनुदानापासून वंचित राहू नयेत म्हणून टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीदरम्यान टपाल विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात बँक खाते आधारशी लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कागदपत्र आवश्यक किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी बँक पासबूक, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्यांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडले जात आहे.
आधार लिंक करणे अनिवार्य
किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बँक खाती आधारशी लिंक केल्यानंतरच किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता जमा होणार आहे.