चंद्रपूर दि. 24 : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद येथील कन्नमवार सभागृहात फ्लोरेन्स नाईट अँगल गौरव पुरस्कार, राष्ट्रीय कुटुंब कल्याण पुरस्कार व राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रम पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, क्षयरुग्णांना औषधोपचार दिल्या जाते. परंतु त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बघून योग्य पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी क्षयरोगाचे दूरीकरण करण्याकरीता विविध उपाययोजना प्रभावीपणे प्रभावीपणे राबविण्याकरीता मार्गदर्शन केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले यांनी उपस्थितांना क्षय रोगाबाबत माहिती दिली.
15 ते 31 मार्च 2023 या कालावधीत क्षयरोग पंधरवडा साजरा करण्यात येत असून जिल्हास्तरावर क्षयरोग जनजागृतीकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय, चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी उत्कृष्ट टीबी नोटिफिकेशन केल्याबद्दल डॉ. शरयू पाझारे, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. आनंद बेंडले या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजू क्षयरुग्णांना कोरडा आहाराची किट वितरीत करून सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे क्षयरोग पथक ब्रह्मपुरी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास दूधपचारे, विलास लेंनगुरे, राजीव खोब्रागडे, राजुरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहुजी कुळमेथे यांना तसेच डॉ.भूपेंद्र लोढिया यांना संशयित रुग्णांची माहिती दिल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता चित्रकला व निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या व यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच उत्कृष्ट क्षयरोग कर्मचारी म्हणून जिल्हास्तरावर डॉ. तेजस्विनी ताकसांडे, किशोर माणूसमारे, स्वाती चव्हाण यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.