सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

232

शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली असून सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. १० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडला तर ही नैसर्गिक आपत्ती मानली जाईल.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. रोज पाऊस झाला आणि त्यामध्ये सातत्य असेल तर पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, असं ते म्हणाले. सध्या ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, गारपीट झाली किंवा पाऊस झाला नाही तर मदत केली जाते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं सततचा पाऊस याचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले.सततचा अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे राज्य सरकारचा आतापर्यंतचा शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.