मुल : तालुक्यातील जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गावातील सहकार चळवळ मजबूत व्हावी. हा परिसर सहकाराच्या बाबतीत अग्रेसर होवुन संस्थेची एक शाखा मुंबईत निघावी. पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटेल असे काम चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार चळवळीने करावे. असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जुनासुर्ला येथील प्रतिकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंञी हंसराज अहिर, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, प्रतिकारचे संचालक चंदू मारगोनवार, मूलचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोयर, नत्थुजी आरेकर, अमोल चुदरी, संजय येनुरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हेवार, उपाध्यक्ष परशुराम नाहगमकर, मानद सचिव माणिक पाटेवार, वासुदेव समर्थ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जुनासुर्ला येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या पतसंस्थेचे कार्यालय उभे झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. एखाद्या कार्पोरेट बँकेच्या ईमारतीलाही लाजवेल अशी ही सुसज्ज पतसंस्थेची ईमारत आहे. प्रतिकार पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचितांना मदत मिळावी. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. या भागातील लोकांना पतपुरवठा कमी पडत असेल तर प्रतिकार पतसंस्थेने अशांची मदत करावी अशी अपेक्षाही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.