मूलमध्ये सुंदर माझा दवाखाना उपक्रमाची सुरुवात

195

चक्क वैद्यकीय अधीक्षकांसह, डॉक्टर, परिचारिकांनी हातात घेतला झाडू

मूल : राज्यातील प्रत्येक दवाखान्याचा परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याकरिता सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे यांच्या पुढाकाराने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर उपक्रम १४ एप्रिलपर्यंत राबविला जाणार असून, उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट होणार आहे.
सार्वजनिक शासकीय दवाखान्यातरुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, शौचालय, प्रसाधनगृह तथा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असते. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने सुंदर माझा दवाखाना उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय मूल येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे संत गाडगेबाबाच्या प्रेरणेतून संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतारुग्णांलाकरण्यात आली. रुग्णालयाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरासह सर्व विभाग, स्वच्छतागृह, भांडारगृह आदी स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल इंदुरकर, डॉ. तिरथ उराडे, डॉ. वसीम शेख, पूजा महेशकर व सर्व आरोग्य कर्मचारी प्रयत्नरत आहेत.