२ लाख रोकडसह २ तोळे सोन्याची चोरी @पोलीस स्टेशन मूल अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ येथे

79

मूल : कुटूंबातील सर्व सदस्य कुलरच्या थंड हवेत गाढ झोपल्याची संधी साधून चोरटयांनी दोन तोळे सोन्यासह नगदी दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना तालुक्यातील बेंबाळ येथे घडली. पोलीस स्टेशन मूल अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ येथे सावन धारणे कुटूंबासह शेतालगत राहतात. बांधकाम ठेकेदार म्हणून काम करणारे सावन धारणे याचे कुटूंब घरगुती भोजनालय आणि डब्बे पोहोचविण्याचे काम करतात. कामाकरीता आवश्यक असल्याने दोन दिवसांपूर्वीच सावन धारणे यांनी बँकेमधून 2 लाख रुपये काढून आणले होते. उन्हाळा सुरु झाल्याने रात्रीच्या उकाडयापासून थंड हवेत शांत झोप लागावी म्हणून सर्वत्र कुलर वापरल्या जात आहे. याच कुलरची संधी साधून काल रात्रो जेवन करून सर्व कुटूंबीय समोरच्या खोलीत कुलरच्या हवेत गाढ झोपले असतांना अज्ञात चोरटयांनी संधी साधली. शेतालगत असलेल्या घराच्या मागील दार फोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. अनावधानाने खिडकीत राहीलेल्या चाबीने आलमारी उघडून ठेवलेले 2 लाख रुपये आणि 2 तोळे सोन्याचे दागीने घेवून पसार झाले. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर गावांतील गोंडाने, संजय इरेकर, पुरुषोत्तम पेटकुले, रमेश शेंडे यांचे कुटूंबिय बाहेरगांवी गेल्याने घराला कुलूप लागले होते. घरी कोणीही नाही याची संधी साधून त्यांच्याही घरात अनधिकृत प्रवेश करुन हात साफ करण्याचा प्रयत्न केला. परंतू हाती काहीच लागले नाही, संदीप गोहणे यांचे घरून मात्र नगदी 5 हजार रूपये चोरटयांना मिळाले. सकाळी उठल्यावर धारणे यांना घरी चोरी झाल्याचे दिसून आले. सदर घटनेची माहिती गांवात पसरताच घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरटयांनी पुन्हा पाच घरी चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. लागलीच सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन मूल येथे दाखल होताच ठाणेदार सुमीत परतेकी यांनी सहका-यांसह बेंबाळ येथे जावून सर्व घटनास्थळांची पाहणी केली. चंद्रपूर येथून श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले, परंतू श्वान पथकास पुरेसे पुरावे न मिळाल्याने श्वान पथकास यश आले नाही परंतू ठसे तज्ञांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अज्ञात चोरटयांचा शोध घेतल्या जात आहे. पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात सहकारी अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत.
बेंबाळ गांव मोठे असून मूल गोंडपिपरी राज्य मार्गाच्या मध्यभागी आहे. परिसराची भौगोलीक स्थिती आणि गरज लक्षात घेवून बेंबाळ येथे पोलीस स्टेशन मूल अंतर्गत पोलीस दूरक्षेत्र मंजुर असून याठिकाणी एक अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत. परंतू रात्रोच्या वेळेस पोलीस दूरक्षेत्र येथे एकही पोलीस कर्मचारी राहत नसल्याने परिसरात अवैद्य व्यवसायाला पोषक वातावरण झाले आहे. पोलीसांच्या गैरहजेरीमुळे चोरटयांवर धाक नसल्याने अनेकदा चोरीच्या घटना घडल्या. त्यामूळे पोलीस दूरक्षेत्र येथे कायम स्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त
करण्यात यावे
चांगदेव केमेकर सरपंच बेंबाळ
शाळांना सुट्टया लागल्या असून लग्नाची चंगळही सुरु झाली आहे, त्यानिमित्याने अनेक कुटूंबांना बाहेरगांवी जाणे अत्यावश्यक आहे. तेव्हा बाहेरगांवी जाणा-या कुटूंबानी घरी कोणतीही महागडी वस्तु, रोख रक्कम न ठेवता ती सोयीच्या व योग्य ठिकाणी ठेवूनचं घर सोडावे. गावांला जात असतांना त्याची माहिती शेजा-याला दयावी, घरात किमान एक तरी विद्युत बल्ब लावुन ठेवावे. असे झाल्यास पोलीस प्रशासनाला चोरीच्या घटनांवर आळा घालण्यास
सहकार्य होईल. पो.नि.सुमीत परतेकी
ठाणेदार मूल