यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,या विद्यापीठाचे ध्येय “ लोक विद्यापीठ “ होण्याचे आहे. विद्यापीठाचा सातत्याने असा प्रयत्न आहे की समाजातील ज्यांच्या पर्यंत शिक्षण पोचले नाही त्यांच्यापर्यंत पोचून प्रमाण पत्र ते पदव्युत्तर असे गरजेनुसार शिक्षण द्यावे. य.च.म.मु.वि चे मुख्यालय नाशीक येथे आहे. ८ विभागात विभागीय केंद्र आणि राज्यभर पसरलेली १७११ अध्ययनार्थी मार्गदर्शन केंद्रे आहेत.
यापैकी मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे,आणि या केंद्रात दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रवेश घेऊन या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा देऊन आपले , पदवीका,पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत आले आहेत करीत राहणार आहेत.
कर्मवीर महाविद्यालयातील केंद्रात प्रवेश आणि याच केंद्रावर परीक्षा हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरळीतपणे सुरू असताना यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी कर्मवीर महाविद्यालयात प्रवेश घेतला, आणि आता परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी आपले सरकार केंद्रावर गेलेअसता प्रवेशपत्र हातात पडले तेंव्हा परीक्षाकेंद्राचे नाव कर्मवीर महाविद्यालय मूलऐवजी राष्ट्रसंत महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर छापलेले दिसून आले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक माहिती साठी चौकशी केली असता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाला म्हणे ,कर्मवीर महाविद्यालय मूल येथे केवळ कनिष्ठ महाविद्यालयाची परवानगी असल्याने आणि या परीक्षा पदवी व पदव्युत्तर असल्याने जवळचे केंद्र म्हणून सावली हे केंद्र परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आले आहे.
एवढ्या वर्षांपासून कर्मवीर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरळीतपणे सुरू असताना ,याच परीक्षा केंद्रावर परीक्षा होत असतांना ,दरवर्षी शेकडो विद्यार्थी यशस्वी होऊन शिक्षण पूर्ण करीत असताना यावर्षी नेमका, कर्मवीर महाविद्यालयात केवळ कनिष्ठ महाविद्यालय असल्याचा हा जावईशोध कुणी लावला?आणि वायसीएमचे परीक्षा केंद्र सावली ला हलविण्याचा निर्णय कोणत्याही सुचनेशिवाय कसा काय घेण्यात आला ?
या अशा तुघलकी निर्णयामुळे यावर्षी परीक्षेला बसलेल्या जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी हातचे सोडून भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना १२किलोमीटर अंतरावर असलेल्या सावलीला जावे लागणार आहे.
या सर्व प्रकारात नेमका दोष कुणाला द्यायचा? कर्मवीर महाविद्यालय मूलच्या प्रशासनाला , त्यांच्या संयोजकांना की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाला की परीक्षा विभाग प्रमुखांना? दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला? या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही कोण करणार? विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळणार?
कारण दिनांक ३०मे २०२३रोज मंगळवार पासून या परीक्षा सुरू होताहेत. अशा या वायसीएमच्या निर्णयाचा विद्यार्थी जगत धिक्कार करीत असून त्यासाठी काही अंशी का होईना कर्मवीर महाविद्यालय प्रशासनालाही जबाबदार धरल्या जात आहे.आणि ही जबाबदारी कर्मवीर महाविद्यालयाची असून त्यांच्या दुर्लक्षित पणामुळेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे.