शालेय शिक्षण विभागाने आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी वेळोवेळी सूचना देऊनही शाळांकडून टाळाटाळ केली जात आहे. राज्यातील तब्बल 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नसल्याचेही समोर आले आहे.
शिक्षण विभागाकडून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आधार प्रमाणित विद्यार्थी गृहीत धरले जाणार आहेत. त्याच माध्यमातून संचमान्यता केली जाणार आहे. मात्र ज्या आधार कार्डमध्ये तफावती आढळून आल्या आहेत, त्यांची माहितीही या संचमान्यतेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने यासंदर्भात काही तफावती आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहनिशा करून निर्णय घ्यावा, मात्र त्यासाठीची सर्व प्रकरणे ही आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील शाळांना आधार कार्ड पडताळणी करून घेण्यासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही तब्बल 13 लाख 42 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळत नव्हते, तर तब्बल 3 लाख 91 हजार विद्यार्थी आधाराविना असल्याची माहिती समोर आली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी 15 जूनपर्यंतच मुदत देण्यात आली असून त्यानंतर शाळांना कोणतीही संधी दिली जाणार नाही.