लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

76
चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील पात्र व्यक्तिंना शासकीय विभाग व अभिसरणामध्ये परदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार एक सर्वसमावेशक कायदा 28 एप्रिल 2015 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. तसेच लोकसेवा हक्क कायद्याच्या कलम 3 अन्वये अधिसुचित केलेल्या सेवांचा लाभ नागरीकांना घेता यावा, यासाठी आपले सरकार पोर्टल अस्तित्वात आणले आहे. या कायद्याची सर्व अधिका-यांनी प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
नियोजन सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कुभांर, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी अतुल जतळे, परिवेक्षाधीन आय.ए.एस रंजित यादव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत आपापल्या विभागाच्या सेवा जलद व पारदर्शीपणे द्याव्यात. दिलेल्या प्रश्नावलीचा अभ्यास करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा. विशेष म्हणजे आपल्या विभागामार्फत दिल्या जाणा-या सेवा व्यवस्थित पात्र नागरिकांपर्यंत पोहचतात की नाही, याची विभाग प्रमुखाने खात्री करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
‘वंदे मातरम् चांदा’ चा आढावा : यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणालीवर असलेल्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेवर सोडवणूक करा. आपल्या विभागाने किती तक्रारी निकाली काढल्या, किती प्रलंबित आहेत, याचा आढावा विभाग प्रमुखांनी घ्यावा. कोणत्याही विभागाने 15 दिवसांच्या वर तक्रार प्रलंबित ठेवू नये, याकडे विभागप्रमुखांनी गांभिर्याने लक्ष द्यावे.