मूल शहरातील बसस्थानकाजवळ मामा तलावाचे@निधीअभावी सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात !

64

निधीअभावी मामा तलावातील सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात !
मूल शहराचे रूप पालटणारा प्रकल्प : तत्काळ निधी देण्याची मागणी
मूल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात रिसोर्ट बेस्ट डेव्हलपमेंट अनुषंगाने मूल शहरातील मामा तलावाजवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईच्या वतीने सौंदर्यीकरण करण्याचे काम मागील चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. कामाला सुरुवात झाली. तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, निधी संपल्याने संबंधित पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रपूर यांना वाढीव निधीसाठी २५ मार्च २०२१ ला पत्र पाठवून निधीची उपलब्धता करण्याची मागणी केली.

मात्र, कुठे पाणी मुरले कुणास ठाऊक दीड वर्षांचा कालावधी लोटला तरी निधी पोहोचला नाही. त्यामुळे काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे मूल शहरवासीयांची निराशा होताना दिसत आहे.

जलसंपदा अधिपत्याखाली विभागाच्या  असलेल्या
बसस्थानकाजवळ असलेल्या या मामा तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव सन २०१३-१४ या वर्षात तयार करण्यात आला. सन २०१५-१६ यावर्षात ४९८.९७ लाख रुपयांचे अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात सन २०१८-१९ या वर्षात कामाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.

तलावाची खरीप हंगामाची सिंचन क्षमता १९२ हेक्टर इतकी आहे. या तलावात नौका विहाराची सुविधा, उद्यानाची निर्मिती, मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी बोटिंग प्लॅटफार्मची निर्मिती, नवीन रस्ते, उद्यानात कारंजे, लहान मुलांसाठी बालोद्यान, प्रसाधनगृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, आदींची सोय केली जाणार आहे.

याच बरोबर नवीन रस्त्यावर वृक्षारोपण, विद्युत पथदिव्याची उभारणी केली जाणार आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे नागरिकांना विरंगुळा, तसेच फिरणे, बसण्यासाठी अप्रतिम स्थळ बनविले जाणार आहे. एवढे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना शेतीला पाणी व कोळी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुव्यवस्थित केला जाणार आहे.

शेती व मत्स्य व्यवसायाला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, याबाबत अभ्यास पूर्ण केल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

तलावाचे सौंदर्यीकरण मूल शहराला नवीन कलाटणी देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वाढीव निधीचा प्रस्ताव पाठवून तो अद्याप मंजूर झालेला नाही.