पैनगंगा नदीने धारण केले रौद्ररूप@अंतरगावला पुराचा वेढा

41

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याचा फटका कोरपना तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसला आहे. तालुक्यातील अंतरगाव या गावात नदीचे पाणी शिरले असून, गावात मार्गक्रमण करणारे रस्ते बंद झाले आहेत.

मुख्य मार्गावर पोहचण्याकरिता शेतातून वाट काढावी लागत आहे. लागूनच असलेल्या सांगोडा, इरई गावातसुद्धा पाणी आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील अंतरगाव, परसोडा, रायपूर, पारडी, अकोला, कोडशी बु., खु., जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा, सांगोडा, कारवाई, इरई, भारोसा, तुळशी या गावाला पुराचा फटका बसला आहे.

पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतीलादेखील पुराचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तर शेती उपयोगी यंत्रे वाहून गेली आहेत. पैनगंगा नदीचे पाणी वाढतच असल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावाला दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. पैनगंगा कोळसा खान पूर आल्याने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना उसंत मिळाल्याचे दिसून येत आहे.

पुरावर मात करत पार पडला विवाह समारंभ
अंतरगावात एकीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली. गावातील काही घरे पाण्याखाली आली तर दुसरीकडे आज गावात विवाह होता. बाहेर गावातील वरात गावात येत असल्याने विवाह करायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी गावातील नागरिकांनी यावर तोडगा काढत गावापासून काही अंतरावर असलेल्या शिवाजी विद्यालयात लग्न समारंभ पार पाडला.