नाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे? चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन ‘राजपत्र’!

111

नाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे? चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन ‘राजपत्र’!तुम्हाला नाव, वय, धर्म बदलवयाचा असेल, तर वृत्तपत्रात जाहिरात देण्याची आवश्‍यकता नाही. महाराष्ट्र शासन राजपत्रात हा बदल सहजतेने करता येतो. पूर्वी ‘राजपत्र’ हजारो नाव असलेल्या भल्या मोठ्या पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होत असे. आता ‘ऑनलाइन’ पद्धतीमुळे राजपत्र पर्यावरणपूरक बनले आहे.

या बदलामुळे अर्जदारांना राजपत्रातील आवश्‍यक पेज एका क्‍लिकवर सहजतेने मिळत आहे.ही ऑनलाइन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून सुरू असली तरी अनेकांची माहितीअभावी धावपळ होते.

काहीजण नावातील अथवा जन्मतारीख, धर्म बदल यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करतात.ही बाब खर्चिक असून, तिला शासकीय मान्यता नाही. महाराष्ट्र शासनाचा नाव, वय, धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा स्वतंत्र ‘भाग दोन’ विभाग असून, हा बदल अधिकृतपणे राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतो.

पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया ही किचकट होती, ऑनलाइन राजपत्रामुळे ती अतिशय सोपी व सहज झाली आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी राजपत्र प्रसिद्धीचे काम मुंबई चर्नी रोड येथील शासन मुद्रण, लेखनसामग्री विभाग या मुख्य कार्यालयात होत असे.

हजारो बदल पुस्तक स्वरूपात छापण्यात येत असे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदाची गरज भासत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ व पर्यावरणाचा ऱ्हास करणारी होती. ऑनलाइन पद्धती ही ‘पेपरलेस’ अर्थातच पर्यावरणपूरक असल्याने अधिक सोपी व वेळेची बचत करणारी ठरली आहे.

अलीकडे नागपूर, पुणे, औरंगाबाद व मुंबई येथून या कार्यालयाचे काम चालते. या पद्धतीत मनुष्यबळाची बचत झाली आहे.

राजपत्रात कोणता बदल नोंदविता येतो?
जन्मतारीख, नाव, धर्म यातील बदल राजपत्रात अधिकृतपणे नोंदविता येतो. विवाहित व नोकरीतील महिला यांच्या नावातील बदल, नावातील काही किरकोळ चुकांची सुधारणा, अलीकडे पूर्ण नावामध्ये आईचे नाव लिहिण्याची पद्धत आली असून, काही हौसी नाव तर कुठे आडनावापुढे ‘पाटील’, नावापुढे ‘साहेब’, दत्तविधानातील नाव बदल राजपत्रात नोंदविता येतात.

राजपत्रासाठी आवश्‍यक कागदपत्रे
आवश्‍यक नाव, जन्मतारीख, धर्म बदलासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यासाठी आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो, शाळा सोडण्याचेप्रमाणपत्र, लग्नपत्रिका, दत्तकपत्र, जन्मनोंद, नावाच्या दुरुस्तीबाबत कागदपत्रे, नावातील चुकांची दुरुस्ती आदी कागदपत्रांची बदलानुसार आवश्‍यकता आहे. ऑनलाइन अर्ज व शुल्क भरल्यानंतर किमान 15 दिवसांच्या कालावधीत राजपत्रात बदल प्रसिद्ध करण्यात येतो.

गेल्या वर्षांपासून नाव, धर्म, जन्मतारीख आदी बदलांचे राजपत्रासाठी काम करीत आहे. मात्र, ऑनलाइन राजपत्रामुळे ही पद्धती अधिक सोपी व गतिमान झाली आहे. अनेकजण वेळेअभावी कार्यालयात जाऊ शकत नाही, त्यांना या पद्धतीमुळे दिलासा मिळाला आहे. राजपत्राला अधिकृत मान्यता आहे