Ø अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर आदेश निर्गमित
चंद्रपूर, दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात यापूर्वी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने व अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळित होण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जुलै 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळै कोणत्याही प्रकारची अनुसुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2)(5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये व महाविद्यालये यांना 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
मात्र इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानूसार सुरू राहतील आणि सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरू राहतील, याची नोंद घ्यावी. तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपात्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या 07172 -251597 आणि 07172- 272480 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.