प्राथमिक स्वास्थ केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल

58

मुल – मुल तालुक्यातील सर्वात मोठे गाव व मोठी आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेंबाळ येथे आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन प्रशस्त ईमारत बांधण्यात आली.
याचा लाभ बेंबाळ या ग्रामीण परिसरात असलेल्या अनेक खेडी गावातील रुग्णांना होईल हाच हेतू ठेऊन ईमारत बांधकाम करण्यात आले. परंतु अत्यावश्यक डॉक्टर, नर्स, कर्मचारी नसल्याने आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने नाईलाजाने रुग्णांना उपचाराअभावी मुल येथे रेफर केले जात आहे. करीता एवढी मोठी इमारत असूनही डॉक्टर व कर्मचारी अभावी नवीन ईमारत आज शोभेची वास्तू ठरत असल्याचे बेंबाळ ग्राम पंचायत सरपंच चांगदेव केमेकर यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलून दाखविले आहे.
बेंबाळ परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावात डोळ्याची साथ, सर्दी, तापाची साथ चांगलीच पसरली आहे. अशा वेळेला गावात निर्माण झालेल्या आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. परंतु आरोग्य केंद्रात फक्त एकच डाक्टर व एकच नर्स आहे. तेही निवासी राहत नाही.
त्यामुळे रात्रीच्या वेळेला आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. किंवा गावाजवळ आरोग्य केंद्र असतांनाही नाईलाजाने गाडी करुन रुग्णाला मुल येथे आणावे लागत आहे. याचा आर्थिक भुर्दंड गरीब नागरिकांना सहन करावा लागत आहे. जे कर्मचारी आहेत तेही आपल्या वेळेनुसार उपस्थित राहत नसल्याचा आरोपही सरपंच चांगदेव केमेकर यांनी केला आहे. त्यामुळे रोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोजच् गर्दी होत आहे.
परंतु डाक्टर,नर्स,कर्मचारी अभावी रुग्णांवर उपचार होत नसल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत. करीता शासनाच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देऊन रात्रीला नियमित निवासी डाक्टर, नर्स, कर्मचारी यांची नेमणूक करावी व रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी सरपंच चांगदेव केमेकर यांनी केली असून सध्यातरी मागील एक महिन्यापूर्वी उभारण्यात आलेली बेंबाळ येथील आरोग्य वर्धीनी इमारत शोभेची वास्तु ठरत आहे.