डोणी@साठ वर्षीय इसमाचा काढला काटा!आरोपीला शोधण्यास पोलीसांना यश

51

जादुटोण्याच्या भितीपोटी युवकाने साठ वर्षीय इसमाचा काढला काटा
पाच तासात आरोपीला शोधण्यास पोलीसांना यश

वारंवार जादुटोणा करून मारण्याची भिती दाखवत असल्याच्या रागातून एका युवकाने साठ वर्षीय इसमाचा काटा काढल्याची घटना तालुक्यातील डोणी येथे घडली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी पाच तासात आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
मूल पासून १५ कि.मी. अंतरावर असलेले डोणी गांव आदिवासी बहुल असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत येते. घटनेतील मृतक अमृत बाजीराव अलाम (६०) आणि आरोपी विजयपाल गोविंदराव अलाम (२५) यांचे शेत एकमेकाला लागुन आहे. दोघांचीही शेती लागुन असल्याने दोन तीन वर्षापूर्वी शेतीच्या वादामधून दोघांच्याही कुटूंबात वाद झाला होता. सदर वादामधून मृतक अमृत अलाम हा आरोपी विजयपाल अलाम याला नेहमी जादुटोणा करून तुला जीवंत मारून टाकतो. अशी धमकी देत असायचा. त्यामूळे आरोपीला मृतकापासून भिती निर्माण झाली होती. याच भितीपोटी आरोपी विजयपाल अलाम याने संधी साधून अमृत अलाम याचा काटा काढला.
घटनेच्या दिवशी १५ सप्टेंबर) मृतक नेहमी प्रमाणे सकाळी शेतीवर जावून १० वा. घरी परत आले. जेवन करून दुपारी ३ वाजताचे दरम्यान मृतक लहान भाऊ भिमराव अलाम यांचे घरी गेले व सायंकाळी ५ वा. दरम्यान गावांतील हनुमान मंदिरजवळ भरणारा बैल पोळा पाहुन घरी परत आले. सायंकाळी ७ वाजतानंतर चुलत भाऊ मंगरू अलाम याला फोन लावतो असे सांगून मोबाईल घेवून समाज मंदिराकडे गेले. ८ वाजून गेले तरी पती अमृत अलाम घरी परत आले नाही या चिंतेत पत्नी अण्णपुर्णा असतांना ८.३० वाजताचे दरम्यान घराजवळ राहणारे मनोज देवीदास नैताम व विकास मधुकर अलाम यांनी पती अमृत हा समाज मंदिराजवळ पडून असल्याचे पत्नी अण्णपुर्णा हिला सांगीतले. पती समाज मंदिराजवळ पडून असल्याची माहिती मिळताच अण्णपुर्णा दिर भिमराव अलाम याला घेवून समाज मंदिराकडे गेली तेव्हा पती अमृत हा समाज मंदिराचे पायरीजवळ टेकुन पडलेले दिसले. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात पाहिले असता अमृतच्या चेह-यावर मारल्याच्या जखमा व दुपट्टयाने दोन हात पाठीमागे बांधुन त्याच दुपट्टयाने गळयाला आवळून बांधल्याचे दिसले. दुपट्टयाने गळा आवळल्याने जीभ चावलेली आणि अमृत मृत झाल्याचे दिसून आले.
सदर घटनेची माहिती होताच ठाणेदार सुमीत परतेकी, सहायक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड, सहायक फौजदार उत्तम कुमरे, राधेश्याम यादव, ताणु रायपुरे, सचिन सायंकार, चिमाजी देवकते, भोजराज मुंडरे, शफीक शेख, आतिश मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत घटनेचा तपास हाती घेतला. घटनेची माहिती होताच जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेसी, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे यांनीही घटनास्थळी धाव घेत आरोपी हा गावांतीलचं असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानुषंगाने पोलीसांनी तपासकामी गावांतील काही जणांना ताब्यात घेवून तपासणी केली असता विजयपाल गोविंदराव अलाम याने अमृत बाजीराव अलाम याचा जादुटोण्याच्या भितीपोटी दुपट्टयाने आवळून खुन केल्याचे मान्य केले. लागलीच पोलीसांनी विजयपाल अलाम याला ताब्यात घेवून कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेच्या तपासकामी पोलीसांनी आरोपी विजयपाल याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी विजयपाल याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी सहाय्यक सचिन सायंकार यांच्या सहकार्याने वरीष्ठांच्या निर्देशान्वये करीत आहेत.