मूल, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून पाळला जातो.
माहितीचा अधिकार कायदा – २००५
हा कायदा १५ जून, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी, म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अंमलात आला. मात्र या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या.
माहितीचा अधिकार प्रत्येक नागरिकाला शासनाकडून कोणतीही माहिती घेण्याचा, कोणत्याही सरकारी कागदपत्रांची तपासणी करण्याचा आणि त्याच्या प्रमाणित छायाप्रती मिळविण्याचा अधिकार देतो . माहितीचा अधिकार नागरिकांना कोणत्याही सरकारी कामाची अधिकृत तपासणी करण्याचा किंवा कोणत्याही कामात वापरलेल्या साहित्याचा नमुना घेण्याचा अधिकार देतो.
लोकशाही आणि सुशासन दोन्हीसाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या स्वातंत्र्याचा प्रचार करताना सरकारी माहिती मिळवण्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सोफिया, बल्गेरिया मध्ये झालेल्या जगभरातील माहिती स्वातंत्र्य संस्थांच्या बैठकीत दिनांक २८ सप्टेंबर २००२ रोजी आंतरराष्ट्रीय ‘माहिती अधिकार दिवस’ प्रस्तावित करण्यात आला. जगभरातील माहिती स्वातंत्र्य संस्था आणि वकिलांनी माहितीचा अधिकार उपक्रमांसह साजरा करण्यासाठी आणि त्याची जागरुकता निर्माण करण्यासाठी ही तारीख चिन्हांकित केली आहे.
२८सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून घोषित करण्यात आला,व तो दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत परंतू बऱ्याच कार्यालयात हा दिवस साजरा करण्यात येत नाही किंवा थातुरमातुर कार्यक्रम पार पाडून त्यांचे फोटो व अहवाल शासनाला सादर केला जातो,मात्र त्याविषयी जनतेला सहभागी करून घेतले जात नाही परिणामी जनतेला अजूनही पुरेसे ज्ञान आणि जाणिव नाही ,सबब एखाद्या कागदपत्रांची अथवा कामाची माहिती मागितली आणि ती मिळाली नाही तर पुढे काय कार्यवाही करावी लागते ,व आपल्या मागणीचा पाठपुरावा करून ती माहिती कशी प्राप्त करायची याबाबत सर्वसामान्य जनता अनभिज्ञ आहे ,व ती तशीच अनभिज्ञ राहावी असाच प्रयत्न केला जातो आहे.
याचाच फायदा घेत बऱ्याच ठिकाणी जनतेला नाहक त्रास देण्याचा व काही अडवणूक करण्याचा प्रकार सरेआम सुरू असल्याच्या तक्रारी आमचे कडे प्राप्त होत आहेत.
सबब, उपरोक्त शासकीय आदेशानुसार २८सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ह्या माहिती दिनी एका कार्यक्रमाचे आयोजन करुन जनतेला माहिती कशी प्राप्त करता येईल याविषयी विभागप्रमुखांनी मार्गदर्शन व सामान्य व्यक्तींनी आपल्या अपेक्षा व्यक्त करीत सुसंवाद साधला जाणे आवश्यक आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही ग्राहक हितासाठी लढणारी संघटना असून मूल तालुका ग्राहक पंचायत मूल तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात हा माहिती दिन साजरा करण्याची व ग्राहकांना माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करण्याची मागणी करीत आहे.
शक्य असेल तिथे ग्राहक पंचायत कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तत्पर असतीलच, अशी ग्वाही ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका कार्यकारिणी द्वारे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.