पुणे : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेला पहिले अपत्य झाल्यावर तीन टप्प्यांमध्ये 5000 रुपयांचे अनुदान खात्यात जमा केले जाते. आता दुसरे अपत्य मुलगी झाल्यास महिलेच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जाणार आहेत. 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झालेला असल्यास हा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
सद्य:स्थितीत मातृवंदना योजनेंतर्गत मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांमध्ये गर्भधारणा नोंदणी केल्यावर पहिला 1000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसरा 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. अपत्याची जन्मनोंदणी व प्राथमिक लसीकरण झाल्यावर तिसरा 2000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होतो. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलगा-मुलीचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, यासाठी शासनातर्फे मुलगी झाल्यास 6000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिलनंतर कोणत्या जिल्ह्यात किती मुलींचा जन्म झाला, याबाबतच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त संचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार मिळावा आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली.
लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
1. लाभार्थी व पतीचे आधारकार्ड
2. लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते
3. गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद
4. शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी
5. बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक
6. लसीकरण प्रमाणपत्र
7. लाभार्थीने अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.