निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

77

चंद्रपूर, दि.30 : चंद्रपूर कोषागार कार्यालयामार्फत, बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी, दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी बँकांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी बँकेत स्वत: उपस्थित राहून आपल्या नावाच्या समोरील रकान्यात मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधारकार्ड क्रमांक नमूद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागार कार्यालयाला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2023 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.

तसेच जे निवृत्तीवेतन धारक मनिऑर्डरद्वारा निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिका-यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयाला पाठवावे. हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2023 पर्यंत प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2023 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.