चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची दुचाकी चोरांवर धडक कारवाई

152

चंद्रपूर – जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत 2 अट्टल दुचाकी चोरांना अटक केली आहे.जिल्ह्यात सतत वाहन चोरीच्या घटना घडत होत्या, जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावावा यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक बनवीत दुचाकी चोरांचा सुगावा लावण्यास सुरुवात केली, गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील M.E.L चौक परिसरात एक इसम विना नंबरप्लेट व कागदपत्रे नसलेली दुचाकी विकण्यासाठी ग्राहक शोधत होता, गुन्हे शाखेच्या पथकाने त्या इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरीची कबुली दिली.गुन्हे शाखेने या गुन्ह्यात 20 वर्षीय करण रघुनाथ वाढई रा. कवढपेठ तालुका मूल व 19 वर्षीय मयूर अतुल चीचघरे रा. सिंतळा तालुका मूल यांना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपिकडून सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल 10 दुचाकी असा एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीनी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 दुचाकी, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत 1, मूल पोलीस स्टेशन हद्दीत 2, पोम्भूर्णा 1, मुलचेरा जिल्हा गडचिरोली पोलीस स्टेशन हद्दीत 1 व 2 लावरीस दुचाकी अश्या 10 दुचाकी जप्त केल्या.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे, गोपाळ पिंपलशेंडे व सायबर पथकाचे प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केली.