शेतकऱ्याची जुनासुर्लाच्या तलाठ्यास मारहाण
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील एका शेतकऱ्याने तलाठी एकनाथ ताबाजी गेडेकर (५७) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ३०) उघडकीस आली.
पोलिसांनी आरोपी साईनाथ बुग्गावार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुनासुर्ला येथील तलाठी एकनाथ गडेकर हे गुरुवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता कार्यालयात कर्तव्यात असताना आरोपी साईनाथ बुग्गावार हा तिथे आला. त्याने सुरुवातीला नमस्कार केला आणि शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेता म्हणत शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे म्हणताच आरोपीने कॉलर पकडून मारहाण केली, अशी तक्रार तलाठी गेडेकर यांनी मूल ठाण्यात दिली. पोलिसांनी साईनाथ बुग्गावार याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढीलतपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.