पवित्र पोर्टलला ’लिंक फेल’ची बाधा @पसंतीक्रम द्यायचा कसा?मुदतवाढ देण्याची मागणी

51

पोर्टलच सुरू होईना; पसंतीक्रम द्यायचा कसा? पसंतीक्रम देण्यासाठी केवळ 01 दिवसांचा कालावधी
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसंदर्भात पोर्टलवर ५ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरातीनुसार उमेदवाराला शाळांची यादी जनरेट करण्यासाठी ६ ते ७ फेब्रुवारीपर्यंत, तर प्राधान्यक्रम देण्यासाठी ८ ते ९ पर्यंत म्हणजेच केवळ दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, या पोर्टलची लिंकच फेल आहे. लिंक सुरू होऊन पोर्टल सुरू झाले तरी शाळांची यादी जनरेट होण्यासच बराच विलंब लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांत शाळांची यादी जनरेट करून पसंतीक्रम द्यायचा कसा, असा प्रश्न पात्र उमेदवारांना पडला आहे.
२०२३ मध्ये ३० हजार शिक्षकांची भरती घेण्याची घोषणा सरकारने केली. त्यानुसार प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यभरातील अनेक डीएड, बीएड टीईटी उत्तीर्ण पोर्टलवर संपूर्ण माहिती भरून मुलाखतीद्वारे तसेच विनामुलाखतीद्वारे रिक्त पदांच्या जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, त्याला बऱ्याच महिन्यांचा कालावधी उलटूनही जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलनसुद्धा केले. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१४ रोजी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्यानुसार ६ ते ७ फेब्रुवारीला उमेदवारांना मुलाखतीद्वारे, तसेच विनामुलाखतीद्वारे येणाऱ्या शाळांची यादी जनरेट करायची होती, तर ८ ते ९ फेब्रुवारीला गरजेनुसार पसंतीक्रम द्यायचा होता.
मात्र, जाहिराती अपलोड झाल्यापासून या पोर्टलची गती मंदावली आहे. बरेचदा तर पोर्टलच सुरू होईना. झाले तर शाळांची यादी जनरेट करायला बराच वेळ लागत आहे. त्यातच याद्या जनरेट करण्यासाठी व पसंतीक्रम देण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने आपण पसंतीक्रम देण्यापासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
मुदतवाढ देण्याची मागणी
प्रत्येक पात्र उमेदवाराला गुणानुसार शाळांच्या याद्या जनरेट होत आहेत. यामध्ये मुलाखत व विनामुलाखतीद्वारे रिक्त पदांच्या याद्या जनरेट होत आहेत; परंतु काही विद्यार्थ्यांना चारशे ते पाचशे शाळांच्या याद्या जनरेट झाल्या आहेत. या सर्व याद्या तपासून पसंतीक्रम देणे आहे; परंतु केवळ दोनच दिवस असल्याने, तसेच पोर्टलसुद्धा जॅम असल्याने पसंतीक्रम द्यायचा कसा, असा प्रश्न आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी
उमेदवारांकडून होत आहे.