अवैध दारू विक्रेत्याविरोधात महिलांचा एल्गार

58

बोरचांदली येथील अवैध दारू विक्रेत्याविरोधात महिलांचा एल्गार
मूल : तालुक्यातील बोरचांदली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याने युवकांसोबतच अनेक अल्पवयीन मुलेही दारूच्या आहारी गेले आहेत. परिणामी गावातील वातावरण कलुशित झाले असून पती- पत्नीत वाद निर्माण होत आहे. त्यामुळे गावात अवैधरीत्या सुरू असलेली दारूविक्री बंद करण्यात यावी, यासाठी शेकडो महिलांनी पोलिस स्टेशन गाठून गुरुवारी पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले.
राज्यात दारूची आडवी झालेली बाटली उभी झाली. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्याने
जिल्ह्यातील परवानाधारक दारूची दुकाने सुरू झाली, असे असले तरी बोरचांदली येथे अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. गावातच दारू मिळत असल्याने पहाटेपासून पुरुष दारूचे सेवन करीत आहेत. त्यामुळे कुटुंबातील पती-पत्नी वाद होऊन कौटुंबिक सलोखा नाहिसा होत आहे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावातील अवैध सुरू असलेली दारू विक्री बंद करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील महिलांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.