मूल, ता. १८ : तालुक्यातील मरेगाव येथे मागील दोन दिवसांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबटयाने शेळया चारायला नेलेल्या एका युवकावर हल्ला करून जखमी केले. वाघाने गोठ्यातील तीन जनावरांना ठार केले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघ आणि बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
या दोन्ही घटना राजोली वनपरिक्षेत्रातंर्गत येतात. शनिवारी रात्री मरेगाव येथे गोठयात बांधलेल्या तीन जनावरांवर वाघाने ताव मारला. विलास उद्धव यांचा गोरा, मुलींधर शंकर वाकुडकर यांची एक गाय आणि एक गार वाघाने ठार केले. वाकुडकर यांचा एक वासरू जखमी झाला आहे. उईके आणि वाकुडकर या दोघांचे घर वस्तीत आहे. गोठयात बांधलेल्या जनावरांवर
वाघाने ठार केल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याच दिवशी शनिवारी दुपारी शेळया चारायला नेलेल्या आशीष राजू दुधकोवार या युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. मागील दोन दिवसांपासून वाघ आणि बिबट गावात धुमाकूळ घालत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. वनविभागाने कॅमेरे लावावे. वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग दहशतीत सापडला आहे.