सांस्कृतिक मंत्रालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक क्रीडासंकुल
झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव देशभरात साजरा होणार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला विश्वास
मूल : सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कलावंत लोककला जोपासत असल्याने त्यांच्या कलेला वाव देणे गरजेचे आहे. कलाकार कितीही मोठा झाला तरी राजाश्रयाशिवाय मोठा होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण भागात झाडीपट्टी सांस्कृतिक कला महोत्सव आयोजित केले आहेत. त्यामुळे येत्या काळात झाडीपट्टी कला महोत्सव राज्यातच नव्हे, तर देशात साजरा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक मंत्रालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक क्रीडासंकुल येथे आयोजित तीनदिवसीय झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सांस्कृतिक मंचावर संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ कवयित्री अंजना खुणे, अभिनेता अक्षय कुलकर्णी, नाट्य निर्माते सदानंद बोरकर, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, तालुका समन्वय समिती अध्यक्ष प्रभाकर भोयर, धनश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अजय गोगुलवार, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, महेंद्र करकाडे, वंदना वाकडे, प्रवीण मोहुर्ले, डॉ. किरण किशोर कापगते आदी उपस्थित होते. कलेची देवता नटराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
गायक संतोष कुकुडकर आणि संचाने सादर केलेले झाडीपट्टी गीत व महाराष्ट्र गीत आणि युवराज गोंगले व ममता गोंगले संचाने सादर केलेल्या स्वागत गीतामुळे महोत्सवात रंगत आली. प्राचार्य सदानंद बोरकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या झाडीपट्टीतील जिल्ह्यांत दीडशे वर्षांची परंपरा असलेली लोककला जोपासण्यासाठी विद्यापीठाने सांस्कृतिक केंद्राची स्थापना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. परशुराम खुणे यांनी कला महोत्सवाचे आयोजन करून शासनाने झाडीपट्टीतील लोककलाकारांचा सन्मान केला, याविषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान झाडीपट्टीतील बहिणाबाई म्हणून परिचित असलेल्या कवयित्री अंजना खुणे, नाट्यनामते प्राचार्य सदानंद बोरकर, नाट्यकलावंत हिरालाल पेंटर आणि पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा शासनाचे वतीने जीवनगौरव पुरस्कार तर विविध नाट्यमंडळांच्या माध्यमातून परिसरात लोककला जोपासत असल्याबद्दल नाट्यकलावंत अरविंद झाडे, विजय मुळे, शेखर पटले, शबाना खान, मंजूषा जोशी, मुकेश गेडाम, भूमाला कुमरे, देवेंद्र दोडके, नारायण चुदरी, अब्दुलगनी शेख, शेखर डोंगरे आदी कलावंतांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अक्षय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी ‘झाडीपर्व’ या विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन गजानन कोर्टलवार यांनी तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व संमेलनाध्यक्ष डॉ. परशुराम खुणे यांचा परिचय मंजूषा जोशी यांनी करून दिला. सुखदेव चौथाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील लोककलावंत आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.