पालकांनो आताच काढून ठेवा दाखले !

50

 दहावी, बारावीची परीक्षा संपली आहे. जूनमध्ये निकाल आहेत. निकाल लागताच पाल्यांच्या पुढील शिक्षणाची पालकांना तयारी करावी लागते. कोणत्या शाखेला अॅडमिशन घ्यायचे हे ठरवावे लागते; परंतु त्याबरोबरच अॅडमिशनसाठी अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज असते.

परंतु ऐन निकाल लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच दाखले कढून ठेवल्यास जूनमध्ये मोठाल्या रांगेत उभे राहाण्याची वेळ पालकांवर येणार नाही. एप्रिलपासूनच विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता पालकांनी आताच केली पाहिजे.

दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत. अलीकडील काही वर्षांपासून या आवश्यकता अधिक भासू लागली आहे. मुळात दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन आधीच झालेले असते; परंतु त्यासाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.

याची माहिती घेण्याकडे बहुतांश पालकांचे दुर्लक्षच होते. परीक्षा संपल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांची सुटी असते. पाल्याच्या शिक्षणाची दिशा आधीच ठरली असेल तर या सुटीत आवश्यक दाखले काढून घेण्याची संधी पालकांना असते. परंतु जूनमध्ये प्रवेश सुरु झाल्यानंतरच दाखल्यांसाठी रांगा लागतात.

कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागते. दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी डोमेसाईल, उत्पन्न दाखला, क्रिमिलिअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी ईडब्ल्यूएस, कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी, कुणबी नोंद नसणाऱ्यांसाठी नव्याने एसईबीसी दाखला, शेतकरी दाखला, अल्पभूधारक आदी दाखल्यांची गरज असते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव कसरत करावी लागते.

पैशांची होते लूट

ऐन वेळी दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात पालक जातात, तर त्या ठिकाणी मोठ मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात, मग बहुतांशी पालक तहसील कार्यालयातील एजंटांच्या जाळ्यात अडकतात. अशा एजंटांना पैसे द्यावे लागतात, मग ते आपले काम करून देतात. अशा परिस्थितीत पालकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता असते.

ऐन वेळी दाखले मिळत नाही

दाखले काढून ठेवण्याचे नियोजन अनेक पालक करीत नाही. त्यानंतर अगदी वेळेवर दाखले काढण्यासाठी जातात. मात्र त्यांना ते वेळेत मिळत नाही. त्यानंतर मात्र प्रशासकीय यंत्रणेलाच दोष दिला जातो. दाखला लवकर हवा असतो; मात्र गर्दीमुळे दाखले मिळण्यास उशीर होतो.

जूनमध्ये एकदमच गर्दी वाढल्याने दाखले वेळेत वेळेत मिळणे मुश्कील होते. मुळात एखादा दाखला काढायचा म्हटले तरी त्यासाठीची भरमसाठ कागदपत्रे काढताना नाकीनऊ येते. त्यामध्ये जातीचा दाखला काढण्याची किचकट प्रक्रिया वेळखाऊ आहे. दाखले वेळेत काढून ठेवणे गरजेचे असते.