मूल शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

35

गुन्हे उघडकीस आणण्यास अडचण

मूल, ता. ७ : गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र, आजच्या घडीला फक्त ८ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील इतर भागात गुन्हेगारी घटना घडली, तर त्याचा उलगडा लावण्यास अडचणीचे ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्या तिसऱ्या डोळ्यांना काचबिंदू झाला असेल, तर शस्त्रक्रिया करा ना? असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. राजकीयदृष्टया संवेदनशील
असलेल्या मूल शहराची लोकसंख्या २६ हजाराच्या आसपास असून, ती सातत्याने वाढतच आहे. त्यावर अंकुश ठेवता यावे यासाठी मागील पाच वर्षांपूर्वी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यावेळी गुन्हेगारी घटनांवर चांगला वचक बसला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ३६ कॅमेरे बंद झाले आहेत. देखभाल, दुरुस्तीची सर्व जबाबदारी नगर परिषद मूलकडे सोपविण्यात आली. मूल शहरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. घरफोडी असो की चोरी ही नित्याचीत बाब ठरली आहे. त्यात एखादी गुन्हेगारी घटना घडली, तर
सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून शोध लावणे सहज शक्य होते.
मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारी वाढतच आहे. झालेल्या घटनेची उकल करण्यासाठी महत्वाचा पुरावाच गायब असेल, तर शोध लागणार कसा ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मूल शहरातील तिसऱ्या डोळ्यांना काचबिंदू झाला असेल, तर त्यांची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मूल शहरात विविध घडलेल्या घटनांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका पार पाडतात. सध्या ४४ पैकी जवळपास ८ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहे. या संदर्भात नगर परिषदेला कळविले होते. त्यांनी लक्ष न घातल्याने महत्वाच्या ठिकाणी काही सीसीटीव्ही कॅमेरे स्वतः पुढाकर घेवुन लावण्यात आले आहेत. मात्र ते अपुरे असल्याचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी सांगितले.