मतदान वाढविण्यासाठी लोकशाहीचा जागर पथनाट्य, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम मूल यांचा पुढाकार

62

मूल/ प्रतिनिधी
मतदानाचे महत्व सर्व मतदारांना कळावे यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसंबंधाने मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील येणाऱ्या शहर व गावा गावात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्या पुढाकाराने लोकशाहीचा जागर हे पथनाट्य जनकल्याण शिक्षण संस्था मूलच्या वतीने सादर करण्यात आले. या पथनाट्याचा शुभारंभ मूल शहरातील मारिया महाविद्यालयाजवळील झोपडपट्टी परिसर व माळी मोहल्यातील चौकात करण्यात आला. यावेळी मतदान करणे हे सर्वाचे कर्तव्य असुन मिळालेल्या अधिकाराचा वापर करून आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करावे व लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ईव्हीएम मशिन बाबत एका उमेदवाराला मतदान केल्यानंतर दुसऱ्या उमेदवाराला जाते हा गैरसमज असुन ज्याला मतदान केले जाते त्या उमेदवाराची व्हीव्हीपॅड मधून एक पर्जी निघत असल्याने हा गैरसमज असल्याचे यावेळी मतदारांना पटवून देण्यात आले.या प्रसंगी नायब तहसीलदार यशवंत पवार व त्यांचे सहकारी अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. या पथनाट्यात अमोल वाळके, बंडु अल्लीवार, रवी वाळके, सौरभ गेडाम, शशिकांत गणविर, बंडु श्रीकोंडावार , मनोज गणविर, प्रज्ञा वनकर , पल्लवी गोंगले आदींनी कला सादर करून मतदारात मतदानाविषयी जनजागृती केली.