पशुपक्षी प्रेमासाठी राहुलचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी

93

मूलच्या राहुलचे असे पक्षीप्रेम  गच्चीवर बाग, त्यात चिमण्यांसाठी घरं; ही गंमत तुम्ही एकदा जाऊन बघा बरं !
मूल: उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. मनुष्यासह मुक्या प्राण्यांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. अशा तप्त उन्हात पशुपक्ष्यांना पाणी व अन्नावाचून धोका होऊ नये, यासाठी मूल येथील पक्षीमित्र राहुल आगडे यांनी चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी चक्क आपल्या घरी पक्षी घरकुलाची निर्मिती केली आहे. तेथे अन्न व पाण्याची सोयही केली आहे. त्याचबरोबरच उन्हाची तीव्रता कमी होण्यासाठी गच्चीवरच बाग फुलवली आहे. पशुपक्षी प्रेमासाठी राहुलचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. तप्त उन्हाच्या झळामुळे बरेच पशुपक्षी तडफडत रस्त्यावर मरनासन्न अवस्थेत दिसून येतात. ही स्थिती बघून पक्षीमित्र राहुल आगडे यांनी घरी पक्षी घरकुल बांधले आहे. येथे येणाऱ्या पशुपक्ष्यांना तो दाणापाणी करत असतो. त्यांना थंडावा मिळावा म्हणून गच्चीवरच बाग फुलवली आहे. या बागेमुळे पक्ष्यांना थंडावा निर्माण करण्यात आला. याच ठिकाणी पक्ष्यांकरिता पाण्यासाठी जलपात्र बांधण्यात आले आहे. त्याच्या या घरकुलात अनेक पशुपक्षी येत असल्याचे दिसून येते.
शालेय शिक्षण घेत असताना पक्ष्यांच्या
संवर्धनासाठी काही तरी करण्याची धडपड सुरू होती. उन्हाळ्याच्या दिवसांत चिमण्या व इतर पक्ष्यांना पाणी व अन्नासाठी धडपड करावी लागते. . त्यामुळेच आपल्या घरी ती सोय करावी
असा विचार केला. तेव्हापासून हा उपक्रम सुरु केला. इतरांनी देखील असा उपक्रम केल्यास पशुपक्ष्यांचे जीवही वाचतील व आपणास आत्मिक समाधान मिळेल.
– राहुल आगडे,
पक्षीप्रेमी मूल