कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न

23

कृषी  महाविद्यालय मुल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अठरावी बैठक दिनांक १८ जून २०२४ रोजी श्री. नामदेव चलाख यांच्या शेतावर संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मा. विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे *“ धान, सोयाबीन व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान ”* या विषयावर चर्चा करण्यात आली. 

या प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने बघावे तसेच शेतीतील येणाऱ्या अडचणींना खचून न जाता त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची जिद्द ठेवावी असे शेतकऱ्यांना आवाहन केले. केवळ धान पिकावर अवलंबून न राहता ओवा, जिरे, सोप या पिकांची सुद्धा प्रायोगिक तत्वावर लागवड करून आपल्या उत्पादनात वाढ करावी.  *प्रा. मोहिनी पुनसे,* विषयतज्ञ कृषिविद्या, यांनी माती परीक्षण का व कसे करावे, त्याचे फायदे काय याबद्दल सखोल माहिती दिली. धान पिकाची निरोगी रोपवाटिका कशी तयार करायची तसेच पेरणीआधी तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी आणि परे तयार करतांना जमिनीमध्ये राख टाकावी त्यामुळे सिलिकॉनचे प्रमाण वाढते व रोपांवर कीड व रोगाचे प्रादुर्भाव कमी होते. वनस्पतीरोग शास्त्रज्ञ *डॉ गितांशु डिंकवार* यांनी भातामध्ये अझोला जैविक संवर्धकाचा नत्र स्थिरीकरण करता वापर व त्याचे फायदे तसेच भातावरील खैरा, करपा, कडा करपा, आभासमय काजळी, भेंडीवरील पिवळ्या शिरा व तुरीवरील मर रोग या रोगांची लक्षणे आणि त्यांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे तयार करण्यात आलेल्या पी डी के वी प्लांट डीसिज गाईड या ॲप बद्दल माहिती दिली त्यामधे विविध पिकांवरील येणारे रोग व त्यांचे व्यवस्थापनाबाबत माहिती दिलेली आहे. *डॉ. अर्चना बोरकर,* विषयतज्ञ कीटकशास्त्र, यांनी धान पिकावर येणाऱ्या विविध किडी व त्यांचे व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती दिली. कीड नियंत्रण सुरु करण्याअगोदर त्या किडी व रोगाबद्दल पुरपणे माहिती घेणे व विषय तज्ञाकडून त्याबद्दल सहनिशा करून नंतर कीड नियंत्रणाची उपाय योजना करणे फार गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. उद्यानविद्या  शास्त्रज्ञ  *डॉ. स्वप्नील देशमुख* यांनी दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करावी, त्यांची लागवड सरी वरंबा पद्धतीच्या वाफ्यावर जैविक आच्छादनाचा वापर करून करावी. तसेच वेलवर्गीय पिकामध्ये मंडप पद्धतीचा वापर करावा त्यामुळे उत्पादनात वाढ होते असे सांगितले. *डॉ. प्रीती दातीर,* विषयतज्ञ विस्तार शिक्षण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याची नोंद केली व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना ट्रायकोडरमा व पिडीकेवी द्रवरूप मायक्रो ग्रेड II या कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याबाबत शाश्वती दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विविध शेतीउपयोगी अॅप व त्याच्या उपयोगाबद्दल  माहिती दिली आणि काही शेतकऱ्यांच्या मोबईल मध्ये इंस्टाल सुद्धा करून दिले. तसेच माती परीक्षण करण्यासाठी एकूण ९ शेतकऱ्यांचे मातीचे नमुने व त्यासंबंधी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतली . सदर कार्यक्रमास एकुण २४ शेतकरी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. याप्रसंगी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. आर. एस. जाधव हे सुद्धा उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे *डॉ. प्रीती दातीर* यांनी संचालन व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.