Ø अर्ज सादर करण्यासाठी गडबड व घाई न करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 4 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही सतत चालणारी योजना असून योजनेच्या पहिल्या टप्प्यात 31 ऑगस्ट 2024 पर्यंत प्राप्त अर्जाचा विचार केला जाईल. तसेच यातील पात्र अर्जदारांना जुलै 2024 पासून लाभ मिळेल. 31 ऑगस्ट 2024 नंतरही अर्ज नोंदणीची प्रक्रिया सतत सुरू राहणार आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यास घाई किंवा गडबड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
योजनेकरीता महिलांची पात्रता : सदर योजनेसाठी विवाहित, विधवा, परित्त्यक्ता, निराधार व घटस्फोटीत महिला पात्र राहतील. तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलाही पात्र राहील.
उत्पन्नाची अट व त्यासाठीचे पुरावे : ज्या महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लक्ष पेक्षा कमी असेल त्या सर्व महिला योजनेसाठी पात्र असेल. उत्पन्नाचा पुरावा म्हणून पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास ते रेशनकार्डच उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य आहे. त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतु केंद्रावर जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे पांढरे रेशनकार्ड असेल त्यांना तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे.
वयोगट : वय वर्षे 21 ते 65 वर्षे असलेल्या महिला.
रहिवासी प्रमाणपत्र : अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील पुरावे सादर करता येईल. 1) तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र, किंवा 2) जन्म प्रमाणपत्र किंवा 3) 15 वर्षे पूर्वीची नोंद असलेले पुढील कागदपत्रे- शाळा सोडल्याचा दाखल (TC), मतदान नोंदणी प्रमाणपत्र, रेशन कार्ड इत्यादी. त्यामुळे वरील पुरावे असल्यास अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतु केंद्रावर जाण्याची गरज नाही.
अर्ज सादर करण्याची पद्धत : महिला स्वतः Narishakti Doot हे अँन्ड्रॉईड App डाउनलोड करून स्वतःचा अर्ज स्वतः भरू शकते. ज्या महिलेला अश्याप्रकारे अर्ज करण्यास अडचण असेल त्यांनी आवश्यक कागदपत्र घेवून जवळचे अंगणवाडी केंद्र, सेतु केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, शहरी भागत वॉर्ड अधिकारी कार्यालय येथे जावून ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहे. ऑफलाइन अर्ज केल्यास संबंधित कार्यालयातून अर्ज प्राप्त झाल्याची पोच मिळेल व जर अर्ज ऑनलाइन केल्यास अर्ज सादर झाल्याचा SMS संबंधितांचे मोबाइल वर प्राप्त होईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा फी लागू नाही.
इतर योजनांचा लाभ घेत असल्यास : जर महिला इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असल्यास व त्या इतर योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास सदर महिला या योजनेसाठी अपात्र असेल. उदा. संजय गांधी निराधार योजनेत शासन दरमहा 1500 रुपये लाभ देते. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारी महिया या योजनेसाठी अपात्र ठरेल.
शेती मर्यादा : शेती मर्यादेची अट काढून टाकण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय समिती : जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी आहेत. ही समिती योजनेची देखरेख व सनियंत्रण करेल. तालुकास्तरीय देखरेख व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तहसीलदार आहेत.