तीन नवीन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

30
चंद्रपूर, दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन नवीन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन प्रियदर्शनी सभागृह येथे करण्यात आले.
भारत सरकारने ऑगष्ट 2019 मध्ये भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्यामध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ केला. देशातील नागरिक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ-युनिवर्सिटी, विधी तज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश, पोलीस अधिकारी यांच्याकडुन यासंदर्भात सुचना मागविण्यात आल्या.
त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 ही तीन विधेयके संसदेमध्ये सादर करण्यात आली. सन 2020 मध्ये गृह मंत्रालयाने डॉ.रणबिरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली सदर विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. त्यानंतर सुधारित विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होवून दिनांक 25 डिसेंबर, 2023 रोजी मा.राष्ट्रपती यांची त्यावर स्वाक्षरी झाली.
सदर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी दिनांक 01 जूलै, 2024 पासून संपुर्ण भारत देशात लागू करण्यात आली आहे. सदर तिन्ही क्रिमीनल नविन कायद्याबाबत चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसुल विभागातील अधिकारी यांना माहिती व्हावी या दृष्टीकोणातून महसूल आणि पोलिस विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेला महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील विधी निदेशक अॅडव्होकेट संजयकुमार पाटील आणि अॅडव्होकेट राजेश सचदेव यांना मार्गदर्शनासाठी बोलाविण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे आज दि.13 व 14 जुलै 2024 रोजी असे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका दंडाधिकारी तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस निरीक्षक यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे जवळपास 1200 लोकांची उपस्थिीती होती.
नवीन तीन क्रिमीनल कायद्याबाबत सदर प्रशिक्षण कार्यशाळा इतक्या मोठया संख्येने घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.