एका रुपयात पीकविमा काढण्याची शासनाने १५ जुलै ही अंतिम मुदत ठेवली आहे. पण शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याने, तसेच सेतू केंद्रावर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण त्यात लिंक फेल असल्याने अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाही. त्यामुळे पीकविमा नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
खरिप पिकांना संरक्षण मिळावे यासाठी पीकविमा योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याची नोंदणी करण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. 01 दिवसांत ही मुदत संपणार आहे. सध्या शेतकरी शेतातील पेरणी, डवरणी, निंदाने, फवारणी कामात व्यस्त आहे. तशातच सेतू केंद्रावर लाडकी बहीण या योजनेची नोंदणी करण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी आहे. तसेच शालेय मुलांच्या दाखल्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची कामे करण्यात सेतू संचालक मग्न आहे.
बरेचदा काम टाकून नोंदणीसाठी शेतकरी सेतू केंद्रावर गेले मात्र लिंक फेलचा खोडा असल्याने अनेकांना नोंदणी न करताच परतावे लागले. ही देखील समस्या ग्रामीण भागात कायम सतावत आहे. शेतातील काम टाकून केंद्रावर गेल्यास दिवसभर बसूनही अनेकदा काम होत नाही. परिणामी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या पीक विम्याची नोंदणी करू शकले नाही. त्यामुळे शासनाने ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.