सायकलसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित  डॉ.राम दांडेकर यांचे आयोजन

35

मूल :- तालुक्याच्या पंचक्रोशीत वैद्यकीय सेवेसाठी प्रसिदध असलेले येथील डॉ.राम दांडेकर यांनी आपल्या सायकलसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला. त्यांच्या वैद्यकीय सेवेत सदैव जीवनसाथी म्हणून या सायकलने कर्तव्य निभावले. तिचे ऋण फेडण्यासाठी या सोहळयाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा मूल येथे रविवारी रामलीला भवन येथे पार पडला. या सोहळयाचे आयोजक स्वतः डॉ. राम दांडेकर हे होते. विलक्षण आणि अभूतपूर्व ठरलेल्या या सोहळयाला कुटुंबीय, आप्तेष्ठ, जेष्ठ नागरीक, गोतावळा आणि प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. डॉ.राम दांडेकर 89 वर्षाचे आहेत. त्यांनी सायकल वरून केलेल्या वैद्यकीय सेवेला 65 वर्षे पूर्ण झालीत. तसेच ते 75 वर्षापासून सायकलचा वापर करीत आहेत. त्यांच्या डॉक्टरी आयुष्याच्या कालावधीत जीवनसाथी म्हणून सायकलने पूर्णतः साथ निभावली.म्हणून त्यांनी सायकलला तेजस्वीनी हे नाव देऊन सायकलचे महत्व अधिक तेजस्वी बनविले. ज्या सायकलने माझया उभ्या आयुष्यात सोबत केली, त्या सायकलचे मला ऋण फेडावे लागेल, असा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याच प्रश्नांमुळे सायकलचा कृतज्ञता सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंचावर अध्यक्षस्थानी कवयित्री शशिकला गावतूरे,नामदेव गावतूरे, माजी प्राचार्य ते.क. कापगते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे, मधुकर घवघवे, माधवराव दांडेकर यांची उपस्थिती होती. सायकलचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून या सोहळयाला सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांनी डॉ.राम दांडेकर यांच्या विषयी आणि त्यांनी वैद्यकीय सेवेसाठी ग्रामिण भागात केलेल्या सायकल प्रवासाविषयी इत्यंभूत माहिती विशद केली. त्यांच्या कार्याचा गौरव मान्यवरांनी यावेळी केला. सोहळयाचे संचालन युवराज चावरे, प्रास्ताविक गंगाधर कुनघाडकर यांनी केले. तत्पूर्वी डॉ.राम दांडेकर यांचे कुटुंबीयाच्या वतीने कुमकुम तिलक करण्यात आले. उपस्थित स्नेही मंडळीच्या वतीने डॉक्टरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार
करण्यात आला.
सायकलचे अनमोल महत्व
सायकलचे महत्व अनमोल आहे. माझया डॉक्टरी आयुष्यात आज पर्यंत या सायकलने जीवनसाथी म्हणून साथ दिली. सायकलसाठी माझया मनातील हा कृतज्ञता सोहळा मी आयोजित करून सायकलचे ऋण फेडीत आहे. या सायकल ला विसरणे अशक्य असल्याचे सांगून डॉ.राम दांडेकर यांनी सायकलसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
डोळयावर चष्मा नाही आणि पायात चप्पल नाही
89 वर्षीय डॉ.राम दांडेकर अनवाणी चालतात. सायकलने फिरुन ग्रामिण भागात वैद्यकीय सेवा केली. सायकलचे महत्व त्यांनी कर्तव्यातून सिदध करुन दाखविले. त्यामुळे त्यांच्या डोळयावर कधी चष्मा लागला नाही. अनवाणी पायाने त्यांची दिनचर्या सुरु असते.आजही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.