पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान खरीप पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर गेल्या वर्षी या योजनेत राज्यातील तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
यंदादेखील ही योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ५६ लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे. मात्र, बनावटगिरीला चाप बसल्याने गतवर्षीपेक्षा विमाधारक शेतकऱ्यांची संख्या किमान दहा लाखांनी कमी राहील, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेमध्ये गेल्या वर्षी एक रुपयात विमा उतरवण्याची संधी शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिश्शापोटीचा प्रीमियम राज्य सरकारने भरला. कृषी विभागाने तसेच विमा कंपन्यांनी यात डोळ्यात तेल घालून अनेक बनावट प्रकार उघडकीस आणले आहेत.
असे प्रकार उघडकीस
एका शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्यानेच विमा काढणे, शासकीय जमिनीवर विमा काढणे, अकृषक क्षेत्रावरील पिकांचा विमा काढणे, मंदिर तसेच अन्य धार्मिक स्थळांवरील जमिनींवरील पिकांचा विमा काढणे, सार्वजनिक संस्थांच्या जमिनीवरील पिकाचा विमा काढणे, जास्त क्षेत्राचा विमा काढणे, बनावट भाडेकरार दर्शवून दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा काढणे, सामायिक क्षेत्रावर परस्पर विमा उतरवणे, एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा काढणे असे प्रकार उघडकीस आले आहेत.
राज्यात गेल्या वर्षी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. यंदा ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर बँकांना पुढील पंधरा दिवस मुदत दिली जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या योजनेत किमान १० लाख शेतकरी कमी सहभागी होतील, असे अपेक्षित आहे. – विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे.