मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा:-ग्राहक पंचायत मूल.

24

मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे मागील  कित्येक वर्षांपासून किरायाच्या घरात असून नवनिर्मिती केलेल्या प्रशासकीय भवनात आधी सोयिस्कर  जागा नाही म्हणून हे कार्यालय स्थलांतरित केले जात नव्हते , ग्राहक पंचायत मूल व शासकीय कार्यालये स्थलांतरण समिती चे वतीने सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासकीय भवनाच्या एका दालनात असणारे सहकारी संस्था निबंधक कार्यालयाची जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी पसंत केल्यानंतर हे कार्यालय प्रशासकीय भवनाच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले व हे दालन दुय्यम निबंधक कार्यालयासाठी मोकळे करुन देण्यात आले, आणि लवकरच दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय भवनात येणार अशी आशा निर्माण झाली

       त्यादृष्टीने  बांधकाम विभागाने या दालनात दुरुस्तीचे कामही केले मात्र लोकसभा निवडणूक व तत्कालीन तहसीलदार डॉ रविंद्र होळी यांची बदली झाल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा मागे पडले . प्रशासकीय भवनात मुबलक जागा असतांना अजूनही दुय्यम निबंधक कार्यालय किरायाच्याच घरात ठेवून शासन नेमके काय साध्य करीत आहेत? कारण त्या किरायाच्या घरात ना शेतकरी वा ग्राहकांना निट बसायला जागा आहे ना कार्यालयात प्राथमिक सोयीसुविधा ,तेथे फक्त सामान्य शेतकरी व ग्राहकांना पायपीट व दलालांचा सुळसुळाट बघायला मिळत असून कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर कुणाचाही वचक उरलेला नाही, त्यामुळे मनमर्जी काम सुरू असल्याच्या जनतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ग्राहक पंचायत कार्यालयात वाढत्या तक्रारी लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने प्रशासकीय भवनात स्थलांतरित होणे काळाची गरज असल्याचे अधिक चौकशीअंती लक्षात येत आहे परिणामी ग्राहक पंचायत मूलचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांचे नेतृत्वात उपाध्यक्ष अशोक मैदमवार ,सचिव रमेश डांगरे व कार्यकारिणी सदस्य प्रमोद मशाखेत्री यांनी तहसीलदार मूल यांचे मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने प्रशासकीय भवनात स्थलांतरित करण्यात आले पाहिजे ही मागणी केली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरित झाल्यास , मुद्रांक व इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी होणारी ग्राहकांची पायपीट थांबणार असून , दलालांचा सुळसुळाट कमी होणे व अधिकारी कर्मचारी यांचेवर आपसूकच वचक निर्माण होणार आहे.

त्यामुळे तातडीने हे कार्यालय स्थलांतरित करण्याची ग्राहकांची मागणी ग्राहक पंचायत मूल ने उचलून धरली आहे.