सीसीटीव्हीच्या मदतीने मूल येथील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या….

33

सिलिंडर चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मूल येथील नवीन रेल्वे स्टेशन वॉर्ड  क्रमांक १६ येथील रहिवासी विलास गोपाळराव आडे यांच्या घरातील पोर्चमध्ये असलेले २ सिलिंडर गुरुवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी लंपास केले. याबाबत फिर्यादी विलास गोपाळराव आडे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन दिवसांत प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अंकुश किशोर लोखंडे (२४), संघर्ष सोमनाथ उंबरे (२४) दोघेही रा. ताडाळा रोड मूल वॉर्ड नंबर १७ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे पाच सिलिंडर आढळून आले. यापैकी दोन सिलिंडर विलास गोपाळराव आडे तर एक सिलिंडर डॉ. बाबा अजीम, एक विनोद गुरमुले व एक श्याम उराडे यांच्या मालकीचे होते. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मूल शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट आहे. चोरीच्या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसही अलर्ट मोडवर असून तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी चांगलीच कंबर कसली आहे.