मूल तालुक्यातील नांदगाव येथे चोरटयांनी दुकाने फोडली

40

दारुच्या बाटल्यांवरही डल्ला
मूल :- तालुक्यातील नांदगाव येथे एकाच रात्री चोरटयांनी नऊ दुकाने फोडली. दुकानातील रोख रक्कम सह चिल्लर पैसे लुटून नेले. बार अॅन्ड रेस्टारंट कडेही मोर्चा वळविला. रेस्टारंटचे आणि गोडावूनचे कुलूप फोडून दारुच्या बाटल्यांवरही डल्ला मारला. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली. या घटनेने नांदगाव येथील व्यापारी वर्गा मध्ये खळबळ माजली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आणि मध्यरात्री पाऊस येत असतानाही चोरटयांनी डाव साधल्याने गावक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आठवडाभरापूर्वी तालुक्यातील चिरोली येथे चोरटयांनी एकाच दिवशी पाच दुकाने फोडली होती. चोरीच्या वाढत्या घटनेवर पोलिसांनी अंकूश लावावा अशी मागणी होत आहे. नांदगाव येथिल गोंडपिपरी मार्गावरच्या बसस्थानकाच्या परिसरात ही दुकाने आहेत. बाबी नंदाराम यांच्या मालकीचे असलेले लकी बार अॅन्ड रेस्टारंट आणि त्यांच्या गोडावूनचे कुलूप फोडून चोरी केली.नरेश नरसपूरे यांचे कॉम्प्युटर आणि झेराक्सचे दुकान,विठठल चापले यांचे इलेक्ट्रानिक रिपेरिंगचे दुकान, पिंटू उमक यांचे बेकरी, समीर चाकलपल्लीवार यांचे डेअरी, बापू लांजेवार यांचा पानठेला, भावेश कोटांगले यांचा पानठेला, नामदेव फरकडे यांचे मातोश्री वस्त्रालय आणि प्रशांत अलगमवार यांचे साई जनरल स्टोअर्स दुकानांचे कुलूप फोडून चोरी केली. या सर्व दुकानातून किती रक्कमेची आणि मुददेमालाची चोरी झाली हे कळू शकले नाही. अंदाजे लाखो रुपयांची चोरी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राकेश गिरडकर यांचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरटयांनी एक कुलूप फोडले आणि दुसरे कूलूप न फुटल्याने तो प्रयत्न फसला. नांदगाव येथिल चोरीची घटना सीसीटिव्ही कैद झाली आहे. येथिल चार पाच दुकानांमध्ये सीसीटिव्ही असल्याने चोरी करतानचे दृश्य येथे कैद झाल आह. एकाच दिवशी नऊ दुकाने फोडणारे चोरटे सराईत असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास मूल आणि बेंबाळ पोलिस करीत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात धाडसी चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे. चोरटयांनी रेस्टारंट मधून चोरलेल्या दारूच्या बाटल्यावर ताव मारल्याची चर्चा नांदगाव मध्ये आहे. याआधी चिरोली येथे एकाच दिवशी पाच दुकाने फोडली होती. नेमके दुकाने फोडून चोरी होत असल्याने पोलिसांनी कडक तपास करावा अशी मागणी गावक-यांकडून होत आहे.